पुणे : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच अत्यवस्थ रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे शहरात आयसीयू आणि ऑक्सिजन खाटांची मागणी वाढली आहे. त्यातच खासगी रुग्णालयांकडून खाटांची लपवाछपवी केली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनातील अधिकारी आता थेट खासगी रुग्णालयांमधील खाटांची तपासणी करणार आहेत. त्यासाठी पथके नेमण्यात येणार असून माहितीमध्ये तफावत आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. दिवसाला पाच ते सहा हजारांच्या दरम्यान रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, आता ती वाढत चालली आहे. परिणामी आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांची मागणी वाढली आहे. डॅशबोर्डावरही खाटा उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली आहे.
पालिकेने ज्या खासगी रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित केल्या आहेत, त्या रुग्णालयात अधिकारी नेमण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालय व्यवस्थापन कोणती माहितीच देत नसल्याचा तक्रारी येत असून नियंत्रित खाटांची माहितीही पारदर्शकपणे मिळत नाही.
राज्य सरकारने कोरोनासाठी ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, काही रुग्णालयांकडून खाटा रिकाम्या असल्या तरी त्याची माहितीच महापालिका प्रशासनाला दिली जात नाही. त्यामुळे शहरात रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णालयांकडून परस्पर खाटा भरल्या जात असल्याचे चित्र आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पालिकेचे पथक या प्रत्येक रुग्णालयामध्ये जाऊन खाटांच्या उपलब्धतेची आणि सत्य परिस्थितीची तपासणी करणार आहे. रुग्णालयाने दिलेल्या खाटांच्या आकडेवारीसह डॅशबोर्डवर भरलेली माहिती तपासली जाणार आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांची लपवाछपवी समोर येऊ शकेल.