पुणे : महापालिकेने शहरात सुरू केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई हा मनमानीचा प्रकार असल्याचा आरोप पुणे शहर छोटे व्यावसायिक, गाळेधारक, भाडेकरू महासंघाने केला. सोसायट्यांमधील अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. याची दखल घेतली नाही तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मंत्री इस्टेस्ट सोसायटीसह परिसरातील अधिकृत गाळेधारकांना महापालिका त्यांचे गाळे बंद करून देशोधडीला लावत आहे, असे महासंघाचे निमंत्रक हसीब कलमानी यांनी सांगितले. परिसरात इमारतीच्या टेरेसवरील बेकायदेशीर हॉटेल्स सुरू आहे. त्यांना मोकळे सोडून लहान व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई व तीसुद्धा बेकायदेशीर केली जात आहे, असे ते म्हणाले. डॉ. पायल शाह, अशोक शिरवी, हिमाराम चौधरी उपस्थित होते.