पुणे : कोरोनावर येऊ घातलेली लस कशारितीने द्यायची याचे प्रशिक्षण आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्याची सुरुवात झाली आहे. त्याचवेळी पुणे महापालिकेने लस साठवणुक क्षमताही मोठ्या प्रमाणात निर्माण केली आहे़ आजमितीला पुणे महापालिकेने आठ लाख लस साठवण्यासाठी डीप फ्रिजरची व्यवस्था केली आहे़
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले की, महापालिकेने ७० आय़एलआर (५ हजार लिटर) आणि ४० ‘डीप फ्रिजर’ यात ८ लाख लशी साठवण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या सर्व रूग्णालयात ही व्यवस्था करण्यात आली आहे़
कोरोना लसीचे लसीकरण हे मतदान बूथप्रमाणे (३ खोल्यांमध्ये) करण्यात येणार आहे़ यात ५ सेवकांचा एक संघ कार्यरत राहणार आहे़ यात १ लस टोचक आणि १ सुरक्षारक्षक असेल. मतदान प्रक्रियेप्रमाणे लसीकरण मोहिम पार पडणार असून, लसीकरणाच्या पोर्टलवर नाव असलेल्या व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांनाच लस देण्यात येणार आहे़ ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण खुले करण्यात येईल त्यावेळी मोबाईल अॅपव्दारे संबंधितांना माहिती भरता येणार आहे़ पुणे महापालिकेकडे आजमितीला वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी व खाजगी अशा ४५ हजार १४३ जणांची नोंदणी करण्यात आल्याचे डॉ. भारती म्हणाले.
चौकट
लसीकरणाचे टप्पे
पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणारे सर्व कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात पुणे महापालिका, पोलिस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरी संरक्षण दल अधिकारी-कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात जोखीमग्रस्त व्यक्ती (५० वर्षावरील व व्याधीग्रस्त) यांना लस देण्यात येणार आहे़ चौथ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे़