पुणे: मान्सूनपूर्व कामाचे कंत्राट आता मुख्यालयाकडून दिले जाते, त्याचा एक रुपयाचा निधीही क्षेत्रीय कार्यालयाला येत नाही. त्यामुळे मान्सूनपूर्व कामाचे ११ कोटी रुपयांचे काय झाले? याचा जाब तुम्ही आयुक्त साहेबांनाच विचारला पाहिजे, अशी कुजबुज क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे गेल्या शनिवारी पुणे शहर आणि सर्व उपनगरांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. गावठाण भागासह सर्वच ठिकाणी दोन ते चार फूट पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे शहरात झाली की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक मान्सूनपूर्व कामासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. मात्र, हे ११ कोटी रुपयांमध्ये कोणत्या कंत्राटदाराने काम घेतले आणि त्यांनी नेमकी काय कामे केली याचे समाधानकारक उत्तर महापालिका मुख्यालय देऊ शकत नाही.
एक बोट आयुक्तांकडे करताना तीन बोटे स्वत:कडे
मुख्यालयातून विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची व ड्रेनेज चेंबरची साफसफाई करण्यासाठी कंत्राट काढले होते, त्याची प्रक्रिया महापालिका मुख्यालयाकडून झाली. मात्र कंत्राटदाराकडून कामे व्यवस्थित होतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाला दिली होती. प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे या कामाचे सुपरव्हिजन होते. मात्र एकाही क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून सुपरव्हिजन करताना कामे निकृष्ट केल्याचा अहवाल दिला गेला नाही. उलट काम सुरळीत असल्याचेच सांगितले गेले. सुपरव्हिजन जरी व्यवस्थित पार पडले असते आणि कामे निकृष्ट झाल्याचा अहवाल तयार केला गेला असता तर कदाचित पुन्हा नाले आणि चेंबर सफाई व्यवस्थित झाली असती.
गेल्या दोन वर्षात तब्बल नऊ कोटी रुपयांचा ज्यादा खर्च
महापालिकेकडून गेल्या तीन वर्षात नऊ नालेसफाईच्या कामात नऊ कोटी रुपये अधिकचा निधी खर्च केला आहे. २०२२ वर्षामध्ये महापालिकेने तब्बल सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या नालेसफाईसाठी २१ कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. त्यामध्ये गेल्या वर्षी एक कोटीने वाढ करत २१ कोटी रुपये खर्च केले तर २३-२४ साली त्यामध्ये थेट आठ कोटी रुपये वाढवत ३० कोटी रुपयांचा निधी खर्च केला. या निधीतील एक रुपयाचा खर्चही क्षेत्रीय कार्यालयाने केला नाही, कंत्राट निविदा काढण्यापासून ते कंत्राट देण्यापर्यंतचे सर्व कामे मनपा मुख्यालयातून झाले.
२०२२-२३ --२१ कोटी रुपये२०२३-२४ -- २२ कोटी रुपये२०२३-२४ -- ३० कोटी रुपये
चेंबर एकीकडे अन् रस्त्याचा उतार दुसरीकडे
महापालिकेच्यावतीने उपनगरामध्ये नव्याने बांधण्यात येणारे रस्ते हे डांबराचे नसून सिमेंटचे आहेत. हे रस्ते बांधताना पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहू नये म्हणून रस्त्याच्या एका बाजूला उतार करावा लागतो. त्या बाजूला ड्रेनेजचे चेंबर किंवा छोटे नाले (पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी) बांधणे अपेक्षित असते. मात्र, रस्त्याच्या उतार एका बाजूला आणि चेंबर दुसऱ्या बाजूला असतात शिवाय रस्त्याच्या कडेला नाले बांधलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तायर होत आहेत.