पुणे : मेट्रोच्या भुयारी मार्गातून जमिनीवर येणाऱ्या स्थानकांसाठी काही खासगी जागामालकांची जागा संपादन करण्यात येणाऱ्या अडचणींसह भूसंपादनासाठी भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त, मेट्रोचे संबंधित विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समस्या असणारी भूसंपादन प्रकरणे या समितीकडे दिली जाणार आहेत.
मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ यांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गात शिवाजीनगर, कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई व स्वारगेट अशी ५ स्थानके येतात. ही स्थानके जमिनीखाली सुमारे २८ मीटर खोलीवर असणार आहेत, मात्र त्यातून प्रवाशांना वर येण्यासाठी सरकते जिने, लिफ्ट अशी व्यवस्था असेल. प्रवासी वर येतील त्या ठिकाणी महामेट्रोला जागा हवी आहे. त्यातील काही जागा सरकारी तर काही खासगी अशी आहे. खासगी भूसंपादन करताना काही कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन, नुकसानभरपाई आदी गोष्टींबाबत आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही समिती निर्णय घेईल, असे गाडगीळ यांनी सांगितले. महापालिकेने या कामासाठी एका स्वतंत्र अधिकाºयाची नियुक्ती करण्याचेही मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
वनाज ते न्यायालय या मेट्रो मार्गावर एकूण ३२६ खांब आहेत. त्यापैकी १०३ खांबांचे फाउंडेशन आता पूर्ण झाले आहे. त्यात नदीपात्रातील ५९ खांबांचाही समावेश आहे. ३१ खांब जमिनीतून वर आले आहेत. १६ खांबांवर सेगमेंट (मेट्रो मार्गाचा एक भाग) बसविण्याआधीची कॅप बसवली आहे. एकूण २ हजार ५७६ सेगमेंट लागणार आहेत. त्यापैकी २६३ सेगमेंट कास्टिंग यार्ड मध्ये तयार झाली आहेत. एकूण ३ स्पॅन (प्रत्यक्ष मेट्रो मार्ग) तयार झाले आहेत, असे गाडगीळ यांनी सांगितले. पावसामुळे नदीपात्रातील काम थांबले आहे. मात्र अन्य कामे सुरू आहेत. २५० टन वजनाचे ही सेगमेंट उचलण्यासाठी व बसवण्यासाठी अवजड वाहनांसह क्रेन वापरावी लागते, त्यामुळे हे काम रात्री करण्यात येत असते, अशी माहिती त्यांनी दिली. पावसाळा संपल्यानंतर कामाला गती येईल, असे ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या काळात नळस्टॉपपासून पुढे मेट्रोचे काम करण्यात येणार नाही. तसेच रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूंना पत्र्याचे बॅरिकेटसही टाकण्यात येणार नाही. महापालिकेच्या सवसाधारण सभेत मेट्रोवर झालेले अरोप निराधार असून मेट्रो मार्गावरील खड्डे बुजवण्याचे पदपथ तयार करण्याचे काम महामेट्रो करत आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.