पुणे : मृत जनावरे उचलण्याचा करार संपल्यानंतर ठेव असलेली रक्कम परत दिल्याचा मोबदल्यात वरिष्ठांसाठी तडजोड अंती २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मनपाच्या शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इर्शाद असे या शिपायाचे नाव आहे. तो महापालिकेच्या आरोग्य भवन येथे नोकरीला आहे.
याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या व्यावसायिकाने तक्रार केली आहे. तक्रारदार यांना महापालिका हद्दीतील मृत जनावरे उचलण्याचा ठेका मिळाला होता. या कराराची मुदत संपली. त्यानंतर महापालिकेकडे ठेव असलेली सुमारे साडे पाच लाख रुपयांची रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदार प्रयत्न करत होते.
त्यातील निम्मी रक्कम परत मिळाली होती. उर्वरित रक्कम परत मिळण्यासाठी इर्शाद याने वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. तक्रारीची पडताळणी २० नोव्हेबर रोजी करण्यात आली. त्यात इर्शाद याने त्याच्या वरिष्ठांसाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदार यांना उर्वरित रक्कम परत मिळाली. त्यामुळे तक्रारदार यांनी माघार घेतली. परंतु, लाचेची मागणी झाली असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, अंमलदार प्रविण तावरे, कदम यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.