लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शहरात दररोज १५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध ठेवावा़ या राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे़ महापालिकेने शहरातील लिक्विड ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, जम्बो व ड्यूरा सिलिंडरची पुरेशी उपलब्धता सज्ज ठेवली असून, आणखी ३५ ड्यूरा सिलिंडर खरेदी करण्यात येणार आहेत़
महापालिकेच्या वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी बैठक बोलविली होती़ यावेळी आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देशमुख, विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते़
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज आवश्यकता भासलेल्या ॲाक्सिजनच्या तुलनेत तिप्पट पटीने महापालिकेने वैद्यकीय ऑक्सिजन सज्ज ठेवावा, अशा सूचना कोरोना साप्ताहिक आढावा बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या़ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज साधारणत: ४८ ते ५० मेट्रिक टन ऑक्सिजन जम्बो रुग्णालयासह महापालिकेच्या सर्व रुग्णालयांना आवश्यक होता़ या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी आज १५० मेट्रिक टन ऑक्सिजनची तरतूद करणे आवश्यक आहे. सध्या यामध्ये केवळ २८३ मेट्रिक टनची कमतरता असून, ही तूट नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या ड्यूरा सिलिंडरमधून भरून निघणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
-----------------
ऑक्सिजन प्लांट येथे आयएमओ सिस्टिम
महापालिकेच्या विविध ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आयएमओ सिस्टिम बसविण्यात येणार आहे़ यातून संबंधित ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन साठा किती आहे, तो किती दिवस किंवा किती वेळ पुरू शकेल़, याची सातत्याने माहिती महापालिकेकडे उपलब्ध राहणार आहे़ यामुळे ऐनवेळी ऑक्सिजन उपलब्धतेसाठी किंवा आवश्यक कार्यवाहीसाठी होणारी पळापळ थांबणार आहे़
--------------------------