पुणे : ‘‘हिरव्या पुण्याची पुणे महापालिका ‘वाट’ लावत आहे. वेताळ टेकडीवरील प्रस्तावित रस्त्यामुळे खूप मोठे नुकसान होणार आहे. महापालिकेत केवळ प्रशासक असल्याने त्यांचेच राज चालत आहे. म्हणून मनमानी प्रमाणे निर्णय घेतले जात असून, त्यांना विरोध करणारे लोकप्रतिनिधी तिथे नाहीत. आता कोणत्याही माजी नगरसेवकाला महापालिकेत विचारले जात नाही. त्यामुळे पुणेकरांनीच आता हातात छडी घेऊन महापालिकेला जाब विचारला पाहिजे,’’ असे खासदार वंदना चव्हाण यांनी आवाहन केले.
वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. त्या पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील असल्याने त्यांना समितीच्या वतीने आयोजित केलेल्या टेकडी बचाव कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. त्या वेळी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
चव्हाण म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून पुण्याची अक्षरश: धुळधाण होत आहे. वाहनांची संख्या वाढतेय, पण पर्यावरण मात्र बिघडतेय. मुठा नदीची देखील वाईट अवस्था केली आहे. नदी पात्रात आता जाऊन पाहिल्यानंतर प्रचंड वेदना होतात. तिथे राडारोडा, सिमेंटचे मोठे पोल पडलेले आहेत. बंडगार्डनला जे काम सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना भविष्यात पुराचा फटका बसणार आहे. तरी देखील तो प्रकल्प रेटला जात आहे.’’
वेताळ टेकडी बचावसाठी नागरिक एकत्र येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. पुणे हे टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, आता त्यावरही अतिक्रमण होत आहे. आताचा प्रस्ताव टेकडीला संपवणार आहे. भविष्यात पुण्याचे हवामान प्रचंड बदललेले असेल. त्यामुळे आताच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे,’’ असे आवाहन त्यांनी केले.