लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएम केअर्सच्या माध्यमातून गेल्या वर्षी ससून रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी २५ व्हेंटिलेटर बंद असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या बैठकीत ससून रुग्णालयाकडून करण्यात आला होता. मात्र, या दाव्यानंतर हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेत २५ पैकी २१ व्हेंटिलेटर सुरू करून घेण्यात आले आहेत.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या पीएम केअर्समधून पुणे शहराला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ८० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर ससूनला दिले होते. त्यापैकी ३४ व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. याची चर्चा कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर झाली होती, त्यानंतर महापौर मोहोळ यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ़. मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क साधून ते महापालिकेच्या ताब्यात घेतले. तसेच हे बंद पडलेले व्हेंटिलेटर दुरुस्त करून घेतले आहेत.
दुरुस्त झालेल्या व्हेंटिलेटरपैकी ८ व्हेंटिलेटर हे बिबबेवाडी येथील रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले असून, इतर व्हेंटिलेटर पुणे महापालिका आणि ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत. आताच्या काळात व्हेंटिलेटरची गरज असताना हे २१ व्हेंटिलेटर सुरू झाल्याने नक्कीच मोठा आधार मिळाला असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.