पुणे : महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या हद्दीत गेलेल्या मात्र अद्यापही वर्ग न झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडींच्या इमारतींची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रलंबित असलेल्या शाळांच्या आणि अंगणवाड्यांचा दुरुस्तीचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे. या शाळांची दुरुस्ती झाल्यानंतर दुरुस्तीचे बिल संबंधित संस्थांकडून घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्या नव्याने झालेल्या नगर परिषदा आणि महानगरपालिकेच्या हद्दीत वर्ग झाल्या. मात्र, या शाळा आणि अंगणवाड्यांचा ताबा अद्यापही या संस्थांनी घेतलेला नाही.यामुळे या शाळांचा आणि अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या पैकी अनेक शाळांची अवस्था बिकट झाली होती. सासवड येथील शाळा पडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका पोहचू नये या हेतूने नादुरुस्त शाळा पाडण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिले होते. तसेच शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीचेही आदेश दिले होते.मात्र, नगर परिषद आणि महानगरपालिकेत गेलेल्या शाळा आणि अंगणवाड्या वर्ग न झाल्याने त्यांच्या दुरुस्त्या रखडल्या होत्या. यावर निर्णय घेण्यासाठी वारंवार मागणी करण्यात आली होती. यामुळे स्थायी समितीच्या सभेत सर्व सभासदांनी या इमारतींची दुरुस्ती जिल्हा परिषदेने करण्याचा ठराव मांडला. याला सर्वांनी मंजुरी दिल्याने या शाळांच्या दुरूस्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.>जिल्हा परिषदेच्या जवळपास३ हजारांहून अधिक शाळा आहेत. तर ४ हजार ६२३ अंगणवाड्या आहेत. या पैकी जवळपास १७२ अंगणवाड्या या नव्याने झालेल्या नगर परिषदा, महानगरपालिकांच्या हद्दीत गेल्या आहेत. यातीलअनेक शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली होती. मात्र, या निर्णयामुळे दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका, नगरपालिका अंगणवाडी, शाळा होणार दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 2:38 AM