पुणे : महापालिकेकडून शहराच्या सुशोभिकरणासाठी बसविलेल्या वस्तूंच्या सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारी हैराण झाले आहेत. विविध रस्त्यांवरील पथदिवे, बल्ब, खांब, जाळ्या, बॉक्सेस, वायर्स, लोखंडी वस्तू आदी वस्तू चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत. छोट्या छोट्या गोष्टींची चोरी होत असल्याने त्याकडे विशेष गांभियार्ने पाहिले जात नाही. मात्र, त्याची गोळाबेरीज कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून विविध विकासकामे केली जातात. पथदिवे बसविण्यापासून ते सुशोभिकरणावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मात्र, या वस्तू चोरीला जात असल्याने पालिकेच्या अधिकाºयांची डोकेदुखी वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये, मुताºयांमध्ये बसविलेल्या ट्यूब लाईट्स, बल्ब आणि वायर्स चोरुन नेल्या आहेत. तर रस्त्यांवर ठेवण्यात आलेले विद्यूत खांबही चोरटे लांबवत असल्याचे चित्र आहे. गर्दुल्ले आणि दारुड्यांकडून या चोऱ्या अधिक प्रमाणात केल्या जात आहेत. काही ठिकाणच्या तर महागड्या फरशाच गायब करण्यात आलेल्या आहेत. नाम फलक, लोखंडी पाट्या, पाट्या लावण्यासाठी उभारलेले अ?ँगल्स, पुतळ्यांभोवतीच्या लोखंडी जाळ्या, सुशोभिकरणासाठी लावलेल्या लोखंडी चेन, रस्ता दुभाजक म्हणून वापरण्यात येत असलेले प्लास्टीक पोलार्डही चोरटे लंपास करीत आहेत. महापालिकेजवळील छत्रपती शिवाजी पुलावर ब्रिटीश कालीन पद्धतीचे रेलींग बसविण्यात आलेले होते. त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पुलाचे सौंदर्य वाढविण्यासाठी ब्रिटीश कालीन पद्धतीचे पथदिवे बसविण्यात आले. मात्र, त्यानंतर काही दिवसातच हे रेलींग चोरीला जाण्यास सुरुवात झाली. वर्दळीच्या या रस्त्यावरील रेलींगचा एक एक तुकडा गायब होऊ लागला. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करीत एका चोरट्याला पकडले होते. मात्र, त्यानंतरही ही चोरीच सुरुच राहीली. सध्या येथील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रेलींग शिल्लक राहिलेले आहेत. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्येही हीच समस्या आहे. ====पालिकेकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना बसण्यासाठी स्टील तसेच लोखंडी बाकडे पुरविण्यात येतात. मात्र, यातील बहुतांश बाकडी जागेवर नाहीत. यातील काही बाकडी चोरीला गेल्याची शक्यता आहेत, तर काही बाकडी खासगी वापरासाठी गायब करण्यात आलेली आहे. चोरीचे बाकडे विकत घेणारे काही ठराविक भंगार व्यावसायिक शहरात आहेत. त्यांच्या दुकानांची पालिकेचे अधिकारी ना चौकशी करतात, ना तपासणी करतात. ====पालिकेच्या एकूण पसाऱ्यामध्ये चोरीला या जाणाऱ्या या वस्तू अगदी छोट्याशा वाटतात. मात्र, सातत्याने चोरी होत असलेल्या वस्तूंची किंमतीची गोळाबेरीज केल्यास हा आकडा कोट्यवधींच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून या चोऱ्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारी देण्याचे प्रमाणही अत्पल्प आहे. त्यामुळे पालिकेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई होत नाही.
वस्तूंच्या चोऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 7:42 PM
शहराच्या विविध रस्त्यांवरील पथदिवे, बल्ब, खांब, जाळ्या, बॉक्सेस, वायर्स, लोखंडी वस्तू आदी वस्तू चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत.
ठळक मुद्देपालिकेकडून तक्रारींबाबत औदासिन्य : कोट्यवधींचे साहित्य दरवर्षी होतेय लंपास