पुणे : पीएमआरडीएच्या बहुचर्चित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलांना मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन करण्यासाठी रोख मोबदला पालिकेने अदा करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जात आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या २३ किलोमीटर लांबीच्या मार्गिका क्र. तीनला पालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये मान्यता दिली आहे. यातील १४ किलोमीटरचा ट्रॅक आणि १४ स्थानके पुणे पालिकेच्या हद्दीत आहेत. दरम्यान, १ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यायची आहे.
यापैकी खाजगी जागेचे भूसंपादन हे महापालिकेने करायचे असून टीडीआर, एफएसआय देउन ज्या जागा संपादित होणार नाहीत, त्याचे भूसंपादनासाठी येणारा खर्च महापालिकेने उचलायचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पीएमआरडीएने प्रकल्पासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जागांची यादी महापालिकेला पाठविली आहे. भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करताना आराखड्यात सुचविलेल्या काही बदलांनाही महापालिकेची मान्यता मागितली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला होता.