गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज, अठरा घाटांवर विसर्जनाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 02:21 AM2018-09-23T02:21:16+5:302018-09-23T02:25:14+5:30
दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे - दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी तसेच त्यानंतरच्या स्वच्छतेसाठी, रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी काही हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या संपूर्ण कामावर वरिष्ठांकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत पोलिसांइतकीच किंबहूना त्यापेक्षा जास्त जबाबदारी महापालिकेचीच असते. मूर्तीचे विसर्जन होण्यापासून ते कचरा साचलेले रस्ते स्वच्छ करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामे महापालिकेला करावी लागतात. त्यामुळेच विसर्जन मिरवणूक महापालिकेसाठीही कसोटीचीच असते. शहरात एकूण १८ घाट आहेत. त्या सर्व ठिकाणी महापालिकेने नदीपात्रात विसर्जनाची तसेच तिथेच लोखंडी हौद बांधून हौदात विसर्जनाचीही व्यवस्था केली आहे. नदी नाही अशा एकूण ८२ ठिकाणी लोखंडी हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय विहीर, कॅनॉल, बांधीव हौदांमध्येही विसर्जन केले जाते. तिथेही महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत.
विसर्जित होणाऱ्या बहुतेक मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. नदीपात्र प्रदूषित होते म्हणून गेल्या काही वर्षांत पर्यावरणप्रेमी अशा मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात करू नये यासाठी जनजागृती करत आहेत. महापालिकेचा त्यात सहभाग असतो, मात्र महापालिका सक्ती करत नाही. त्यांनी लोखंडी हौद उपलब्ध करून दिले आहेत. त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे.
मागील वर्षी लोखंडी हौदात तब्बल ७ लाख २२ हजार ५९७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नदीपात्रात ८८ हजार ४६५ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. काही कुटुंबांकडून आता घरातही मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यांच्यासाठी मूर्ती लवकर विरघळणारे अमोनियन बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्यात येत असते.
घाटांवर सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती येत असतात. त्यांच्याबरोबर कार्यकर्ते, भाविक यांची गर्दी असते. त्यामुळेच शहरातील सर्वच घाटांवर महापालिकेने सीसीटीव्ही बसवले आहेत. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. महापालिकेचे कर्मचारी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी हजर असतील. अग्निशमन दलाच्या वतीने जीवरक्षक जवान नदीपात्रात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ते विसर्जनाच्या वेळी नदापात्र, विहिरी, कॅनॉल याठिकाणी लक्ष ठेवतील.
निर्माल्य नदीत टाकले गेले तरीही नदीचे पाणी प्रदूषित होते. त्यासाठी महापालिकेने सर्व ठिकाणी मोठे निर्माल्य कलश ठेवले आहेत. त्यातच निर्माल्य टाकावे असे आवाहन केले जाते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मागील वर्षी ६ लाख १ हजार ६९९ किलोग्रॅम निर्माल्य यातून जमा झाले व त्यापासून खतनिर्मिती केली गेली. याही वर्षी सर्व घाटांवर तसेच क्षेत्रीय कार्यालयांनाही निर्माल्य कलश पुरवण्यात आले आहेत.
प्लॅस्टिकबंदीची तपासणी
प्लॅस्टिकच्या वापराला कायद्याने बंदी केली आहे. गणेशोत्सव काळात प्लॅस्टिकचा वापर होऊ नये यासाठी महापालिकेने दोन पथकांची स्थापना केली आहे. ही पथके प्लॅस्टिक वापराला प्रतिबंध करतील व तरीही न ऐकणाºयांना दंड करतील. तसे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष
विसर्जनाच्या ठिकाणी तसेच मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी स्तनदा मातांसाठी महापालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. त्याशिवाय महिलांसाठी हिरकणी कक्षही असतील. तिथे महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गरजू महिला आल्यास तिला या कक्षातून सर्व प्रकारची मदत द्यावी असे आदेश महिला कर्मचाºयांना देण्यात आले आहेत.
रस्ते होणार त्वरित स्वच्छ
उत्सव काळात रस्ते अस्वच्छ होतात. महापालिकेचे कर्मचारी ते त्वरित स्वच्छ करणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळीही कर्मचारी काम करणार आहेत.
मोबाईल स्वच्छतागृहे
मिरवणूक मार्गात स्वच्छतागृहे नसल्यामुळे बºयाच जणांची अडचण होते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकूण २०० फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली आहेत.