पुणे : शहरातील सर्व रस्त्यांवरील गतिरोधक (स्पीड ब्रेकर) काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता, सुमारे ६६७ स्पीड ब्रेकर अशास्त्रीय असल्याचे आढळले होते. त्यातील सुमारे अडीचशे स्पीड ब्रेकर काढण्यात आले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या चारही दिशांच्या रस्त्यांवर उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून, सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी वाहनांचा ताशी वेग अवघा दहा ते बारा किलोमीटर प्रतितास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनांचा वेगच कमी असल्याने स्पीड ब्रेकर असल्यास कोंडीत आणखी भर पडत आहे.त्यामुळे जर गरज भासली तरच वाहतूक पोलिस आणि महापालिकेचा संयुक्त निर्णय घेऊन यापुढे रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्यात येणार आहेत. शहर स्पीड ब्रेकर मुक्त होऊन वाहतुकीची गती वाढण्याची अपेक्षा आहे. शहरात सुमारे दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. महापालिकेच्या पथ विभाग, प्रकल्प विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक उभारले जात होते.
प्रत्यक्षात गतिरोधक उभारताना इंडियन रोड काँग्रेसच्या कोणत्याही निकषांचे पालन केले गेलेले नाही. त्यामुळे गतिरोधकांची उंची, लांबी, रुंदी आणि आकारमान हे निकष या कामात पाहिले गेलेले नाहीत. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गल्लीबोळांसह मोठ्या रस्त्यांवरही वेगवेगळ्या आकारांचे आणि प्रकाराचे गतिरोधक आढळतात. मात्र, या स्पीड ब्रेकर्सचा अंदाज न आल्याने अनेक चौकांत वाहतूक कोंडीत भर पडते आहे. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांकडून हे स्पीड ब्रेकर काढण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ६६७ स्पीड ब्रेकर अशास्त्रीय व चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिकेने ते काढण्याची विशेष मोहीम हाती घेतली होती.
शहरात नेमके किती स्पीड ब्रेकर आहेत? याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. जुन्या हद्दीत चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून, नवीन ३४ गावांच्या समावेशानंतर आणखी पाचशे ते सहाशे किलोमीटर रस्त्यांची भर त्यात पडली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार स्पीड ब्रेकरची संख्या निश्चित केली जात आहे. तसेच खड्डे, अंतर, रस्त्यांवरील अडथळे, चेंबर याप्रमाणे यांचे सर्वेक्षण केले जात आहे.