अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या भरपाईची प्रतिक्षा
पुणे : शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा महापालिका करत आहे. शासनाने यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. शासनाच्या सूचनांनुसार पालिकेच्या पथ विभागाने विविध भागांमधील रस्त्यांच्या नुकसानीचे अवलोकन करून तसा अहवाल शासनाला पाठविला होता. एकूण ६ कोटी ८५ लाख रुपयांची मदत मागण्यात आली होती. डिसेंबरमध्ये पाठविलेल्या या अहवालावर शासनाकडून काहीच केले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहरात यंदाच्या पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नाल्यांना पुन्हा पूर आल्याने अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. यासोबतच रस्त्यांचे नुकसान झाले. या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्यानंतर हाती घेण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी शासनाने पालिकेला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन दुरुस्तीसाठी अपेक्षित असलेल्या खर्चाचा अहवाल मागविला होता.
पथ विभागाने नुकसानीचा आढावा घेतला. त्यामध्ये एक लाख चौरसफुटांपेक्षा अधिक रस्त्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला. या नुकसानीची दुरुस्ती करण्याकरिता ६ कोटी ८५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा अंदाज बांधण्यात आला असून, तसा अहवाल पथ विभागाने शासनाला पाठविला आहे. डिसेंबरमध्ये पाठविण्यात आलेल्या या अहवालावर शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले.