पुणे : एकीकडे पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना महापालिका मात्र ‘ट्रॅफिकची समस्या नाही, पुण्यात प्रवास आनंददायी’ अशी जाहिरातबाजी करीत आहे. वाहतूक कोंडीविषयक एका संस्थेच्या सर्वेक्षणात पुणे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडीचे शहर ठरलेले असताना महापालिका मात्र शहरात वाहतूकीची समस्या नसल्याचा हास्यास्पद दावा करीत आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग परसेप्शन सर्व्हे’ च्या अंतर्गत पालिकेने नागरिकांना याविषयी मत नोंदविण्याचे आवाहन केले आहे. लोकेशन टेक्नोलॉजीमधील तज्ञ असलेल्या टॉमटॉम या संस्थेने जगातील ५७ देशांमधील ४१६ शहरांच्या वाहतूक समस्येबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये बेंगलुरु प्रथम क्रमांकावर, मुंबई चौथ्या तर नवी दिल्ली आठव्या क्रमांकावर आहे. पुणे शहर सर्वाधिक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. शहरात सुरु जागोजाग सुरु असलेली खोदाई, मेट्रोचे काम, पालिकेच्या वाहनांची दुरवस्था, जागोजाग पीएमपी बस बंद पडून होत असलेली वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या अशा एक ना अनेक अडचणी वाहनचालकांसह नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. पादचाºयांना चालण्यासाठी पुरेसे आणि सलग पदपथ नाहीत. सायकल ट्रॅक आणि सायकल योजनेचा बोजवारा उडाला आहे. पालिकेने अद्यापही पार्किंग धोरणाची अंमलबजावणी केलेली नाही. खराब रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव अशा कित्येक समस्यांवर अद्यापही तोडगा काढणे शक्य झालेले नाही. कोट्यवधींचा खर्च करुनही शहरातील वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. पालिका मात्र, शहरात वाहतूक कोंडीची समस्या नसून पुण्यातला प्रवास आनंददायी असल्याची प्रसिध्दी करीत आहे. पालिकेच्या या दाव्यावर टीका होऊ लागली आहे.====== ‘इज आॅफ लिव्हिंग परसेप्शन सर्वे’मध्ये शहरात वाहतूक कोंडी नसल्याचा करण्यात आलेला पालिकेचा दावा हास्यास्पद आहे. एकीकडे कोंडीत जीव गुदमरत असताना पालिकेने असा दावा करणे म्हणजे आंधळ्या कारभाराचा नमुना आहे. ज्याच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली असेल त्याचा शनिवार वाड्यावर जाहिर सत्कार करायला हवा. हा जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच======पालिका केवळ स्वप्न रंजन करते आहे. हे लिहिणारी व्यक्ती पुण्यात राहते की युरोपात? यापेक्षा दुसरा विनोद असू शकत नाही. वाहतूक समस्या हा गंभीर विषय आहे. पालिकेकडे प्लॅन खूप असतात, त्यासाठी सल्लागार नेमले जातात. त्यांच्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यांच्याकडून घेतलेल्या प्रस्तावांवर अंमलबजावणी करीत नाहीत. पालिकेला आजवर मिळालेली बक्षिसे ही केवळ देखावे तयार करुन मिळाली आहेत. त्यावरच अधिकारी समाधानी असतात. पदाधिकारी आणि अधिकारी वस्तुस्थितीपासून दुरावल्याचे हे उदाहरण आहे. पुण्यात वाहतूक कोंडी नाही म्हणणे म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सर्वेक्षणापेक्षा लोकांना दैनंदिन आयुष्यात अनुभव काय येतो हे महत्वाचं आहे.- प्रशांत इनामदार, पेडेस्ट्रियन फर्स्ट
पुणे महापालिका म्हणतेय, पुण्यात कुठेय वाहतूक कोंडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:10 PM
वाहतुक सुधारणेवर होतोय दरवर्षी कोट्यवधींचा खर्च
ठळक मुद्दे वाहतूक कोंडीविषयक एका संस्थेच्या सर्वेक्षणात पुणे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडीचे शहर ‘इज ऑफ लिव्हिंग परसेप्शन सर्व्हे’ च्या अंतर्गत नागरिकांना याविषयी मत नोंदविण्याचे आवाहन