पुणे : शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू झाल्यापासून आजपर्यंत जवळपास ८ हजार ४१० मृत्यू झाले असून यातील बहुतांश मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पालिकेला साधारणपणे अंत्यसंस्कारांसाठी एका मृतदेहामागे दोन हजारांच्या आसपास खर्च येतो. आतापर्यंत अंदाजे एक कोटी ७० लाखांच्या आसपास खर्च आल्याची माहिती विद्युत विभागाने दिली.
राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. तर, कोरोनामुळे पहिला मृत्यू ३० एप्रिल रोजी झाला होता. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ८ हजार ४१० मृत्यू झाले आहेत. सुरुवातीच्या काळात या मृतदेहांवर नातेवाईक पालिकेच्या परवानगीने अंत्यविधी करू शकत होते. त्याकरिता चार ते पाच जणांनाच उपस्थित राहण्याची अनुमती होती. पालिकेने मात्र सुरुवातीपासूनच कोविड मृतदेहांवरील अंत्यविधी मोफत केले.
पालिकेच्या हद्दीमध्ये पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी, ससून रुग्णालयातून आलेल्या मृतदेहांवरही अंत्यविधी केले जातात. पालिकेच्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आल्याप्रमाणे दिवसाला ५० ते ५५ नागरिकांचा मृत्यू होतो. कोविड काळात हे मृत्यू वाढले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले. पारंपरिक पद्धतीने लाकडावर अंत्यविधी करण्यास सुरुवातीला मनाई होती. केवळ गॅसदाहिनी आणि विद्युतदाहिनीमध्ये अंत्यविधी केले जात होते. परंतु, मृतांचा आकडा वाढल्याने लाकडावर अंत्यविधींना सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या लाटेत पर्यावरणपूरक व्हाईट कोलचा वापर करण्यात आला.
-----
शहरातील एकूण कोरोना बाधित - ४,७२,४३१
बरे झालेले - ४,६०,०७८
सध्या उपचार घेत असलेले - ३,९४३
एकूण मृत्यू - ८,४१०
----
एका अंत्यसंस्काराचा खर्च दोन हजार
पालिकेला एका अंत्यसंस्कारासाठी साधारणपणे दोन हजार रुपयांचा खर्च येतो. यामध्ये वीज बिल, गॅस सिलेंडरचा खर्च, ऑपरेटर, कर्मचारी खर्च आदी खर्चाचा समावेश आहे. हा आकडा पुढे-मागे होऊ शकतो. मात्र, अडीच हजारांच्या वर जाणार नाही. पालिकेने बहुतांश अंत्यविधी हे गॅस दाहिनी व विद्युत दाहिनीमध्ये केलेले आहेत. कालांतराने लाकडावर आणि दुसऱ्या लाटेत व्हाईट कोलवर अंत्यविधी करण्यात आले आहेत.
----
मृतदेहामागे होणारा खर्च
गॅस दाहिनी - १, ४२४ रुपये
विद्युत दाहिनी - १२० रुपये
व्हाईट कोल (ब्रिकेड) - २५०० रुपये
----
अंत्यसंस्काराच्या कामासाठी ११९ जणांना नेमण्यात आले. गॅस आणि वीज दाहिनीमध्ये काम करण्यासाठी ऑपरेटर्स नेमण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेत जेव्हा मृत्यूंचे प्रमाण वाढल्यानंतर ४० कर्मचारी वाढविण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना दैनंदिन रोजंदारीवर मानधन दिले जाते. ऑपरेटरला साधारणपणे दिवसाला ७५० रुपये दिले जातात.
----
पालिकेकडून विद्युत दाहिनी, गॅस दाहिनीमध्ये कोविड मृतदेहांवर अंत्यविधी केले जातात. आवश्यकतेनुसार लाकडावर आणि व्हाईट कोलवर मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास परवानगी दिली. प्रत्येक प्रकारच्या अंत्यविधीला वेगवेगळा खर्च येतो. सर्वसाधारणपणे एका मृतदेहामागे दोन हजारांच्या आसपास खर्च येतो. यामध्ये सर्वप्रकारचे खर्चांचा समावेश आहे.
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग