पुणे : पालिकेच्या हद्दीमध्ये ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेकडून यापुर्वी चार केंद्र सुरु करण्यात आलेली होती. मंगळवारी आणखी सात केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले. खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
लसीकरणामध्ये सर्वाधिक अडचणी ‘को -विन’ अॅपमुळे येत होत्या. ही प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारनंतर ही प्रणाली व्यवस्थित सुरु झाली. पालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयामध्ये १०० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मंगळवारी लस घेतली. येत्या काही दिवसात ४० केंद्र कार्यान्वित केली जाणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. सीजीएचएस आणि एमजीपीवाय या योजनांसह एकूण ७० ते ८० रुग्णालयातील केंद्रांवर आगामी काही दिवसात लसीकरण सुरु होणार आहे.
ज्या प्रमाणात लसीकरण होत जाईल त्याप्रमाणे लस देण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत दिली जाणार असून कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. खासगी रुग्णालयांना पालिकेकडून लस पुरविली जाणार आहे. त्यापोटी रुग्णालयांना पालिकेला प्रतिलस १५० रुपये द्यावे लागणार आहेत. तर, खासगी रुग्णालयांना ही लस २५० रुपयांमध्ये देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत १ लाख ९२ हजार डोस पालिकेला प्राप्त झाले आहेत. खासगी रुग्णालयांनी पैसे भरल्यानंतर ही लस त्यांना देण्यात येणार असल्याचे अगरवाल म्हणाल्या.