पुणे : स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाच्या कामाकरिता येणाऱ्या खर्चापैकी १५ टक्के आर्थिक भार पुणे महापालिका उचलणार आहे़ याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली़
महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केला होता़ पूर्वीच्या डीपीआरनुसार महापालिकेच्या वाट्याला खर्चाचा कमी हिस्सा येत होता़ मात्र ६ एप्रिल,२०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा हिस्सा १५ टक्के करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता़
यानुसार सदर मेट्रो मार्गासाठी महापालिकेला आपला हिस्सा आणि भूसंपादन असा मिळून साधारणत: ७३३ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च उचलावा लागणार आहे़ या पूर्वीच्या प्रस्तावानुसार, महापालिकेस केवळ भूसंपादनाचा खर्च करावा लागणार होता. मात्र, हा विस्तारीत प्रकल्प असल्याने केंद्राकडून केवळ १० टक्केच अनुदान देण्यात येणार असल्याने महापालिकेस हा वाढीव खर्चाचा भार उचलावा लागणार आहे.
स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला असून, ५़ ४६ किलोमीटरचा हा पूर्ण मार्ग भूयारी असणार आहे़ यात कात्रज, गुलटेकडी आणि साईबाबानगर ही तीन स्थानके असणार आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या विकास आराखड्यातही हा प्रकल्प दर्शविण्यात आला होता. मात्र, हा आराखडा तयार करताना त्यात काही बदल करण्यात आले आहेत, त्यानंतर या प्रकल्पाचा एकूण खर्च ४ हजार २८३ कोटी रुपये इतका झाला आहे़