लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी आता महापालिकेने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या मालक व विकसकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे़ याकरिता स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार असून लवकरच अतिरिक्त कर्मचारी वर्ग बांधकाम विभाग केवळ याच कामासाठी नियुक्त करणार आहे.
महापालिकेने शेकडो अनधिकृत बांधकामांना नोटीस दिल्या आहेत. यानंतरही अनाधिकृत बांधकामे थांबलेली नाहीत. अनाधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई महापालिका करते. मात्र अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकाम करून नागरिक लगेच राहण्यास येतात़ त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेला लगेच कारवाई शक्य होत नाही़ याच बाबीचा फायदा घेत काही ठिकाणी अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. यापार्श्वभूमीवर आता महापालिकेने कडक धोरण अंगीकारले आहे. याअंतर्गत थेट मालकावर व विकसकांवर विशेष गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापुढे अनधिकृत बांधकाम करणारे जागा मालक आणि विकसकांवर गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे.
चौकट
अनाधिकृत बांधकामांविषयी महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी नुकतीच आढावा बैठक घेत या बांधकामांविरोधात कडक कारवाई करण्याची सूचना दिली आहे़ यापुढे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी ‘लोकमत’ला दिली़