पुणे : शहरात उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सच्या मिळकत कराचा वाद न्यायालयामध्ये असतानाच, आता पुणे महापालिकेने भूमिगत केबलवरही वार्षिक मिळकत कर आकारणीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केला आहे.
छत्तीसगडमधील भिलाई महापालिकेप्रमाणेच पुणे महापालिकेकडून ही मिळकत कर आकारणी करण्यात येणार आहे़ महापालिका प्रशासनाने शहरातील भूमिगत केबलची निश्चित माहिती नसल्याने, प्रत्येक रनिंग मिटरला १० रुपये ३० पैसे बिगर निवासी वाजवी दर निश्चित केला आहे़ त्यानुसार भुमिगत केबलसाठी मिळकत कर आकारणी करण्याचे हे धोरण मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवले असून, स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्य सभेची मान्यता यास मान्यता घेऊन त्याची शहरात अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
-------------------
वार्षिक ४ लाख १९ हजार कर मिळण्याची अपेक्षा
एक किलोमिटर अंतरातील एक केबलकरिता लागणा-या जागेचे क्षेत्रफळ लक्षात घेता, एक किमी अंतरासाठी भूमिगत केबलकरीता वर्षाला ४ लाख १९ हजार ७०४ रुपये मिळकत कर आकारणी महापालिकेला करता येणार आहे़
शहरात कायदेशीर व बेकायदेशीररित्या भूमिगत केबल्स किती आहेत, याची माहिती प्रशासनाकडे नाही़ त्यामुळे कायदेशीर व बेकायदेशीररित्या टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल्स शोधण्यासाठी महापालिकेने नुकतीच एका एजन्सीची नियुक्ती केली आहे.
दरम्यान महापालिकेने अशारितीने केबल्सवर मिळकत कर आकारणी सुरू केल्यास शहरात इंटरनेट, ब्रॉडबँन्ड, मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे खर्च वाढल्यामुळे, पुण्यातील या सेवांचे दर महागण्याची शक्यता आहे.