पुणे : कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सुमारे शंभरपेक्षा अधिक लग्नाचे किंवा इतर सोहळ्यांसाठीचे हॉल, लॉन्स आणि मंगल कार्यालये आहेत. त्यात सध्या लग्न मुहूर्त जोरात आहेत. त्यामुळे अनेक कार्यालयांमधून अन्नपदार्थ, फुले, तांदूळ आणि इतर अनेक प्रकारचा कचरा जमा होतो. मात्र त्यात कोणतेही विभाजन केले जात नाही. त्यामुळे अर्थात महापालिकेला त्यावर प्रक्रिया करणे अवघड होत आहे. अनेकदा या कार्यालय व्यवस्थापनांना महापालिकेने सूचना केल्या होत्या. अखेर महापालिकेने आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातून ३७ हजार ५०० रुपये इतका दंड गोळा केला असून यापुढेही कारवाई सुरु असणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे.
याबाबत घनकचरा विभागप्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले की, यापूर्वी महापालिकेने कार्यालयांना लेखी सूचना आणि नोटीसही बजावल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कार्यालयांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशाच पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया आणि विभाजन न करणाऱ्या सोसायट्यांवरही महापालिका कारवाई करणार आहे.