पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन घरीच करावे़ असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. तसेच यावर्षी गणेश विसर्जनासाठी कुठेही तात्पुरत्या स्वरूपात हौद उभारणी अथवा गणेश विसर्जन घाटांवर गणेश मुर्तींच्या विसर्जनास परवानगी दिली जाणार नाही, असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. दरम्यान,शहरामध्ये दरवर्षी साधारणत: ५ लाख घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होत असते. त्यामुळे या मुर्तीचे घरात विसर्जन करताना त्या मूर्ती पाण्यात विरखळण्याकरिता, पुणे महापालिकेच्यावतीने 'अमोनियम बायकार्बोनेट' हे रसायन नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे. गणेश मुर्ती विक्रेते स्टॉल, क्षेत्रिय कार्यालय येथे हे रसायन नागरिकांना विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. गणेश मुर्तींच्या विसर्जनाकरिता दरवर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक बाहेर पडतात. पुणे शहरात साधारणत: घरगुती ५ लाख प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींची प्रतिष्ठापना होते़ या मुर्तींच्या विसर्जनाकरिता जरी एका मुर्तीबरोबर कुटुंंबातील चार सदस्य गृहित धरले तरी, शहरात वीस लाखाहून अधिक नागरिक विविध भागांमध्ये बाहेर पडतील़ या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, यावर्षी महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकट काळात सामाजिक भान बाळगून पुणेकरांनी यंदा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच करावे़ तसेच घरगुती गणेशमूर्तींची उंची २ फुटांपर्यंत मर्यादित असावी़ असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे़ याचबरोबर गणेशोत्सव विसर्जनाच्या दुसºया दिवशी निर्माल्य आणि मूर्ती अवशेष मनपाकडून घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ ------------------------------------ गणेशमुर्तीची खरेदी ऑनलाईन पध्दतीने करावी शहरात यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या गेलेल्या नाहीत.तर गणेशमूर्ती विक्री परवानग्या केवळ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर दिली गेली आहे. अशावेळी नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी गणेशमुर्तींची खरेदी ऑनलाईन पध्दतीने करावी, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. 'गणेशमूतीर्ची विक्रीच्या परवानग्या मनपाच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्याचे नियोजन केले जात आहे. उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी यावर्षी दिली जाणार नाही. याचबरोबर अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायास पूर्णपणे प्रतिबंध केला जाणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. ------------------
गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन; खरेदीही करावी ऑनलाईन पध्दतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:38 PM
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींकरिता करणार रसायनाचाही पुरवठा
ठळक मुद्देगणेश मुर्ती विक्रेते स्टॉल, क्षेत्रिय कार्यालय येथे हे रसायन नागरिकांना विनामूल्य उपलब्ध राहणार