मंचर: मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन मंचर शहर नगर पंचायत स्थापन करण्याच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सही करून मंजुरी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंचर नगर परिषदेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे अशी ग्रामस्थांची व मंचर ग्रामपंचायतीची सन २०१३ पासूनची मागणी सुरु होती. याकामी आपण शिवसेना शिष्ठमंडळासमवेत मंत्रालय, मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची वेळोवेळी भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मागील आठवड्यामध्ये मंत्री महोदयांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, माजी सरपंच दत्ता गांजाळे, सुनील बाणखेले आदींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी मंचर नगर पंचायतीचा प्रस्ताव दोन दिवसात मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी या खात्याचे उपसचिव सतीश मोघे यांना दिल्या. त्यानुसार या प्रस्तावावर काल मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून तसेच याबाबत स्वतःहून मला दूरध्वनी करून मंचरकरांसाठी आनंदाची बातमी कळविली. पुढील तीन ते चार दिवसातील सोयीची वेळ निश्चित करून मुंबई येथे पत्रकार परिषदेद्वारे मंचर नगर पंचायतीची घोषणा करणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचे आढळराव पाटील यांनी संगितले.