पुणे : पुणे महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक प्रभाग पद्धतीने होण्याला राज्य शासनाचा हिरवा कंदील मिळाला असून अध्यादेशाद्वारे कायद्यात बदल करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे गेल्यावेळी झालेल्या निवडणुकांप्रमाणेच दोन वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणुका होतील.तीन वॉर्डांचा एक प्रभाग करुन २००२ साली निवडणुका झाल्या होत्या. या पद्धतीमुळे राजकीय वाद उद्भवले. त्याचा परिणाम विकासकामे रखडण्यावर झाला होता. त्यामुळे २००७ साली पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा दोन वॉर्डांचा प्रभाग करुन निवडणुका घेतल्या गेल्या. या निर्णयाविरोधात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन प्रभाग पद्धतीला विरोध दर्शविला होता. त्यावर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येतील, असे सरकारने स्पष्ट केले होते. २०१७ मध्ये पुण्यासह, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका नेमक्या कशा होणार याबाबत संभ्रम असतानाच गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग पद्धतीला अनुकुलता दर्शवीत प्रभाग पद्धतीनेच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी होत आहे. या कायद्यात बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्यामुळे तसा बदल करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. (प्रतिनिधी)
महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीनेच
By admin | Published: January 08, 2016 1:46 AM