लक्ष्मण मोरे पुणे : एकीकडे महापालिका आयुक्तांपासून सर्व अधिकारी कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तर, दुसरीकडे मात्र, पालिकेचेच काही कर्मचारी कर्तव्यापासून तोंड फिरवत आहेत. असाच अनुभव पाषाण येथील शांती निकेतन सोसायटीमध्ये आला. कोरोना संशयिताचा मृतदेह उचलण्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यावर न घाबरता त्यांच्याकडून पीपीई किट घेऊन पोलिसांनीच हा मृतदेह उचलला. पालिकेचे कर्मचारी कर्तव्यात चुकले; परंतु पोलीस मात्र कर्तव्याला जागल्याची घटना शुक्रवारी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण येथील शांती निकेतन सोसायटीमध्ये एक तरुण जोडपे राहते. हे जोडपे मुळचे तामिळनाडू येथील आहे. यातील पुरुष ३४ वर्षांचा तर त्यांची पत्नी २९ वर्षांची आहे. या दाम्पत्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे. यातील पती टाटा कंपनीमध्ये उच्च पदस्थ अभियंता म्हणून नोकरी करीत होते. ते सध्या पुणे मेट्रोचे काम करीत होते. त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयाद्वारे ऑनलाईन उपचार घेत होते. उपचार घेत असताना त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या होत्या. घरामध्ये असतानाच त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला.
घरामध्ये एकट्याच असलेल्या त्यांच्या पत्नीने सोसायटी चेअरमन आणि अन्य लोकांना मदतीसाठी बोलावले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिलेला असल्याने मृतदेहाला हात लावण्यास कोणी तयार होईना. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. नियंत्रण कक्षाकडून चतुःश्रुंगी पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस कर्मचारी महेश बामगुडे, अनिकेत भोसले, दीपक फापाळे आणीनपोलिस मित्र गब्बर शेख घटनास्थळी धावले.
त्यांनी सर्व माहिती घेतल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले खरे; परंतु त्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. वास्तविक त्यांच्याकडे पीपीई किट होते. तरीही त्यांनी नकार दिल्यावर मृताच्या पत्नीची अवस्था अधिकच बिकट झाली. त्यांनी गयावया करूनही पालिका कर्मचारी नकारावर ठाम होते. पोलिसांची विनंतीही पालिका कर्मचाऱ्यांनी मानली नाही.
पोलिसांनी निश्चय करीत पालिका कर्मचाऱ्यांना पीपीई किटची मागणी केली. बामगुडे आणि शेख यांनी हे किट अंगावर चढवत पोलिसांनी हा मृतदेह नवव्या मजल्यावरून खाली आणला. शेख यांच्या रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात हा मृतदेह पोचविला. तेथे या मृतदेहाची तपासणी करण्यात आली. त्यांच्या छातीत पाणी झालेले होते, परंतु त्यांना कोरोना झालेला नसल्याचे निष्पन्न झाले. सर्व सोपस्कार पडल्यावर पोलिसांनी हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ------------ आजारी मुलाला नेण्यासाठी आई वडील आले पण...
आजारी असलेल्या आपल्या मुलाला नेण्याकरिता तामिळनाडूवरून आई-वडील दोन दिवसांपूर्वी निघाले. कोरोना नसल्यास मुलाला गावी नेऊन उपचार करण्याचे त्यांनी ठरविले होते. परंतु, ते पुण्यात पोहचण्यापूर्वीच त्यांच्या मुलाने घरातच जीव सोडला होता. -------------- पालिकेचे एक आरोग्य निरीक्षक आणि एक अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांच्याकडे पीपीई किट होते. परंतु, त्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यासाठी कर्मचारी बोलावले नाहीत की रुग्णवाहिका सुद्धा बोलावली नाही. पोलिसांनाच रुग्णवाहिकेचा बंदोबस्त करावा लागला.