नीलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) व प्रजनन व बाल आरोग्य (आरसीएच) या योजनांसाठी नियुक्त केलेले ३६४ आरोग्यसेवक आजमितीला महापालिकेच्या १९ प्रसूतिगृहे व ७० हून अधिक छोट्या-मोठ्या दवाखान्यात आरोग्यसेवा बजावत आहेत. या सेवकांमुळे महापालिकेच्या आरोग्यसेवेला हातभार लागला आहे. अन्यथा वर्ग एकच्या १५१ मान्य पदांपैकी केवळ ७ पदांवर नियुक्ती केलेल्या पालिकेच्या आरोग्य विभागावर कामाचा ताण आला असता.
‘एनयूएचएम’ व ‘आरसीएच’चे आरोग्यसेवक कोरोना आपत्तीत अग्रभागी राहून इतर वेळीही आपली सेवा महापालिकेच्या विविध रुग्णालयांत व कार्यालयांत बजावत आहेत. मात्र महापालिका स्वत:ची आरोग्य यंत्रणा कधी सक्षम करणार, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे.
कोरोना आपत्तीत ‘एनयूएचएम’चा वैद्यकीय सेवक वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य यंत्रणेबरोबर दिवसरात्र कार्यरत होता़ या आपत्तीपूर्वीही हा सेवक वर्ग मूळ कामाव्यतिरिक्त वापरला जात होता़ त्यामुळे सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘एनयूएचएम’चा वैद्यकीय सेवक वर्ग मूळ कामी रुजू करण्याबाबतचे पत्र देण्यात येणार आहे़ याबाबतचा अहवालही मागवणार असल्याची माहिती ‘एनयूएचएम’च्या राज्य मुख्यालयाकडून देण्यात आली आहे़
महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी यासंदर्भात सांगितले की, कोरोना आपत्तीत आरोग्य विभागासह महापालिकेच्या इतर सर्व विभागांनी एकत्रित काम केले़ आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच सर्व जागा भरल्या जातील़
चौकट
पालिकेच्या ‘आरोग्या’ची दुर्दशा
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकरिता शासन मान्यतेनुसार वैद्यकीय अधीक्षकांपासून, न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन आदीपर्यंतची १५१ पदे मंजूर आहेत़ आजमितीला यापैकी केवळ ७ जागांवरच नियुक्ती झाली आहे. उर्वरित १४४ जागा रिक्त आहेत़ तर वर्ग दोनची ७८, वर्ग तीनची २३८ आणि वर्ग ४ ची २७३ पदे रिक्त आहेत़
चौकट
‘खासगी’ तिजोऱ्या भरण्याचे काम
“महापालिकेच्या आरोग्य विभागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतील वैद्यकीय सेवक शहराची आरोग्य यंत्रणा चालविण्यासाठी वापरले जातात. शेकडो कोटी रूपयांची आर्थिक तरतूद असलेल्या आपल्या आरोग्य विभागाला सक्षम करण्यापेक्षा शहरी गरीब योजनेसारख्या योजना राबवून खासगी रुग्णालयांची तिजोरी भरण्याचे काम महापालिका सध्या करीत आहे.” -विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच