पुणे : एका बाजूला महापालिका पर्यावरणपूरक गणेशविसर्जन करण्याच्या घोषणा करत असताना चमकोगिरी करण्याच्या नादात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. महापालिकेने शहरात ८१ रथ तैनात केल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, प्रत्यक्षात रस्त्यावर विसर्जन रथ दिसतच नव्हते. फिरत्या विसर्जन हौदाच्या गाड्यांवर बॅनर लावले नसल्याने या गाड्या रस्त्यावर आल्या नाहीत.
पाऊस पडल्याने गाड्या ओल्या झाल्याने त्यावर बॅनर बसत नसल्याने दुपारपर्यंत गाड्या कात्रज तलाव येथेच अडकून पडल्या होत्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाला फटका बसला. पुण्यातील नदीच्या विविध घाटांवर नागरिकांना यावे लागले. कोरोनाच्या संकटापासून गेल्या काही दिवसांपासून महापालिका नागरिकांना आवाहन करत होती. नागरिकही गर्दी करायची नाही म्हणून विसर्जन रथांची वाट पाहत होते. परंतु, अनेक भागांत विसर्जन रथ दिसलेच नाहीत.
नागरिकांना विसर्जनासाठी मनस्ताप होत असल्याचे पसरल्यावर मग अनेक नगरसेवक जागे झाले. व्हॉॅटसॲॅपच्या माध्यमातून कोठे व्यवस्था आहे, याची माहिती नागरिकांना अनेकांनी दिली. परंतु, तोपर्यंत अनेकांचे विसर्जन झाले होते.
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची पळापळ
नागरिकांना मनस्ताप होत असताना महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांची मात्र सर्व काही सुरळीत दाखविण्याची पळापळ सुरू होती. अभिप्रायाच्या वहीत अत्यंत चांगली व्यवस्था केल्याचे नागररिकांकडून लिहून घेतले जात होते. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
मनस्तापाचा एक अनुभव
मी सिंहगड रोड आनंदनगर येथे राहतो. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी सर्वप्रथम राजारामपुरी येथील सार्वजनिक हौदापाशी गेलो. मात्र तेथे कोणतीही व्यवस्था अथवा महापालिकेचा कर्मचारी नसल्याने कर्वेनगर मार्गे कोथरूडला जाण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रवासात महानगरपालिकेचा एकही फिरता हौद दिसला नाही. अखेर डहाणूकर कॉलनीमध्ये कमिन्स कंपनीच्या शेजारी महानगरपालिकेने तेथील उद्यानामध्ये गणेश मूर्ती दानाची सोय केली होती. गणेश मूर्ती दान करणारा पहिलाच भक्त असल्यामुळे तेथे कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांनी सर्वप्रथम मला अभिप्राय वहीमध्ये अभिप्राय लिहिण्यास सांगितले. येथील सर्व सुविधा चांगली आहे आणि महानगरपालिकेचा चांगला उपक्रम आहे असा मजकूर त्यांनीच सुचवला. यानंतर मी गणेशमूर्ती दान केले. प्रथेप्रमाणे येताना वाळू अथवा खडे आणणे अपेक्षित असल्याने मी त्यांच्याकडे वाळूची मागणी केली. मात्र तेथे ती ही सुविधा उपलब्ध नव्हती
- ओंकार दीक्षित, नागरिक
महापालिकेचे हे दावे आज ठरले फोल
* पुणे महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात नागरिकांना गणेश विसर्जन करण्यासाठी ८१ विसर्जन रथ तयार करण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांत हे रथ असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटावर किंवा महापालिकेच्या हौदांवर नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी शहराच्या सर्व भागात विसर्जन रथांची व्यवस्था करण्यात आली आहे.
*नागरिकांच्या सोईसाठी मूर्ती संकलन केंद्रेही उभारण्यात आली आहेत. याठिकाणी नागरिक आपल्या मूर्तींचे दान करू शकतील.
घराच्या घरी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता पुणे महापालिकेने एकूण २२ टन अमोनियम बायकार्बोनेट सर्व क्षेत्रीय कार्यालयांव्दारे, प्रत्येक आरोग्य कोठ्यांच्या ठिकाणी आणि गणेशमंडळाच्या ठिकाणी नागरिकांना मोफत वाटण्याची व्यवस्था केली आहे.
--