पुणे : महापालिकेच्या 'शहरी गरीब' योजनेला बुस्टर देण्याकरिता महापालिकेने वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर आता रुग्णालयांसमवेत संवाद साधायला सुरुवात केली आहे. रुग्णालयांची पालिकेकडील थकबाकी, रुग्णांची होणारी हेळसांड, उपचारांतील दिरंगाई आदी विषयांवर बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये चर्चा केली. सर्व रुग्णालयांची थकबाकी चुकती केली जाईल तसेच पुढील आर्थिक वर्षात भरीव तरतूद केली जाईल, असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले. शहरी गरीब योजनेचा लाभ देणाºया रुग्णालयांच्या प्रतिनिधींसमवेत बुधवारी संवाद आणि समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौरांसह उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्यासह रुग्णालयांचे १०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शहरी गरीब योजनेच्या थकीत रकमांमुळे रुग्णालयांकडून उपचार नाकारणे, त्यांना खाटा उपलब्ध नसल्याचे सांगणे आदी प्रकारे टाळाटाळ केली जाते. याविषयी चर्चा केली. महापौर मोहोळ यांनी रुग्णालयांना त्यांची बिले अदा केली जातील. तसेच आगामी अंदाजपत्रकात या योजनेकरिता भरीव तरतूद केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच रुग्णांना वेळेत व योग्य उपचार देण्याच्या सूचनाही केल्या.महापालिका, आरोग्य विभाग व रुग्णालयांसोबत समन्वय साधून यामधून मार्ग काढण्यात येईल. तसेच महापालिकेच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी याकरिता विशेष लक्ष दिले जाईल असे घाटे यावेळी म्हणाले. तर, स्थायी समिती अध्यक्ष रासने म्हणाले, या योजनेकरिता मूळ तरतूद २० कोटींची होती. आवश्यकतेनुसार आणखी ३५ कोटींचे वर्गीकरण करुन दिले आहे. वास्तविक वर्गीकरण न करण्याचा निर्णय घेऊनही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्राधान्याने वर्गीकरण उपलब्ध करुन दिले आहे. हा विषय संवेदनशील असून रुग्णालयांनाही मयार्दा आहेत. रुग्णालयांचे ३७ कोटी रुपये थकित असून ३५ कोटींचे वर्गीकरण दिले आहे. उर्वरीत तीन महिन्यांकरिता आगामी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करणार असल्याचे रासने म्हणाले. या बैठकीमध्ये रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी काही आक्षेप नोंदविले. या आक्षेपांना समाधानकारक उत्तरे देऊन रुग्णालयांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले. रुग्णालयांमध्ये रुग्णांनी उपचार घेतल्यावर एक महिन्याच्या आत पैसे मिळतील अशी यंत्रणा विकसित करण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन पदाधिकाºयांनी दिले. बैठकीचे प्रास्ताविक सहायक आरोग्य अधिकारी डॉ. साबणे यांनी केली.
'' शहरी गरीब '' ला बुस्टर देण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 10:45 PM
वेळेत आणि योग्य उपचार देण्याच्या महापौरांकडून सूचना
ठळक मुद्देरुग्णालयांची पालिकेकडील थकबाकी, रुग्णांची होणारी हेळसांड, उपचारांतील दिरंगाई आदी विषयांवर बैठक