पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यालयासह, दवाखाने, विभागीय कार्यालय, शाळा आदी ४० हून अधिक आस्थापनांकडे मार्च, २०२१ अखेर ४२ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याबाबत आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास या सर्व आस्थापनांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डबरोबरच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही पाणीपट्टी थकबाकीबाबत महापालिकेने नोटीस बाजवली आहे. बोर्डाकडे असलेल्या २६२ नळजोड यांची १० कोटी ३८ लाख रुपये थकबाकी भरण्यासही आठ दिवसांची मुदत दिली आहे़ पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाणीपट्टी थकबाकी भरण्याबाबत वारंवार सूचित केले आहे. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी महापालिकेने त्यांना नोटीस बजाविण्याचा निर्णय घेतला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाबरोबर महापालिकेची शहरातील अनेक शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी असून, ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता पाणीपुरवठा विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचेही ते म्हणाले.