पुणे : कात्रज तलावात बोटिंग सुरू व्हावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने त्रस्त झालेले नगरसेवक वसंत मोरे यांनी आता आंदोलनासाठी वापरलेली बोट थेट आयुक्तांच्या दालनात नेऊन ठेवण्याचा इशारा दिला आहे. या योजनेत महापालिकेला भागीदारी मागून अधिकारीच झारीतील शुक्राचार्य होत असल्याचा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) या बोटिंगसाठी पालिकेबरोबर करार केला आहे. त्यानंतर काही वर्षे हे बोटिंग सुरू होते व त्याला चांगला प्रतिसादही मिळत होता. कालांतराने बोटिंगमुळे कात्रज प्राणी संग्रहालयातील प्राणी, तसेच पक्षी अस्वस्थ होत असल्याची तक्रार काही पर्यावरणवादी, स्वयंसेवी संघटनांनी केली. त्यामुळे बोटिंग बंद झाले. आता बोटिंगसाठी जुन्या तलावाच्या वर दुसऱ्या तलावाचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे तिथे बोटिंग सुरू करावे, अशी मोरे यांची मागणी आहे. जुन्या करारावरच बोटिंग सुरू करण्याची तयारीही एमटीडीसीने दाखवली आहे. जुन्या करारानुसार यातून महापालिकेला १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते. मात्र, पालिकेने आता हा करार मोडीत काढून एमटीडीसीने पालिकेला या योजनेत ५० टक्के भागीदारी द्यावी, अशी मागणी केली आहे. बोट एमटीडीसीची, बोट चालवणारे कर्मचारीही त्यांचेच, बोटीला काही अपघात झाल्यास त्याचीही सर्व जबाबदारी एमटीडीसीचीच, बोटीची देखभाल दुरुस्तीही त्यांचीच, पालिकेच्या मालकीचा फक्त तलाव असणार, त्यामुळेच एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी या बदलास नकार दिला आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली.
पालिका अधिकारीच झारीतील शुक्राचार्य
By admin | Published: December 18, 2015 2:31 AM