येरवडा : दरवर्षी निर्माण होणारी पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पावसाळी वाहिन्या व नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून या गंभीर समस्येसंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या सोबत तातडीने बैठक घेणार असल्याची माहिती वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. वडगावशेरी मतदार संघातील डॉ. आंबेडकर सोसायटी, फुलेनगर, प्रतिकनगर, शांतीनगर, गंगा कुंज सोसायटी कळस, वैभव कॉलनी, धनेश्वर शाळा मुंजाबावस्ती धानोरी, कीलबिल सोसायटी, लक्ष्मीनगर, संकल्प सोसायटी लोहगाव, कर्मभुमी नगर या परिसरातील नाल्यांची आमदार टिंगरे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच प्रत्यक्ष जागेवर असणारी परिस्थिती व नैसर्गिक नाल्याचा प्रवाह याची वस्तुस्थिती याचा सविस्तर अहवाल महापालिका आयुक्तांना समोर मांडण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली.
या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी जागेवर नाल्याची रुंदी कमी झालेली आहे. भूसंपादना अभावी नाल्यांची कामे देखील रखडलेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होत नसल्यामुळे दरवर्षी पूर सदृश्यपरिस्थिती निर्माण होते. त्याचा नागरिकांना खूप त्रास होतो. स्थानिक क्षेत्रीय कार्यालय तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. गंभीर बाब म्हणजे महापालिका प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पावसाळ्यापूर्वीच नैसर्गिक नाले व पावसाळी वाहिन्यांची पाहणी केली. नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी करणे, नाल्याचा प्रवाह सविस्तरपणे बनवणे यासह गंभीर बाब म्हणजे नाले बुजविणे यामुळे वडगाव शेरी मतदारसंघातील बहुतांश ठिकाणी पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. ज्याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. त्यातच महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या ठिकाणी पावसाळी वाहिन्या उपलब्ध नसल्यामुळे या गंभीर परिस्थितीत नागरिकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील होत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार टिंगरे यांनी सोमवारी ही पाहणी केली. यापूर्वीच वडगावशेरी मतदार संघातील उर्वरित नाल्यांची पाहणी करण्यात आली असून लवकरच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन महापालिका क्षेत्रिय कार्यालय तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तयार केलेला अहवाल सादर करण्यात येणार आहे. पावसाळी वाहिन्या तसेच नाल्यांची दुरुस्ती व इतर आवश्यक कामासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध असून तातडीने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमदार सुनील टिंगरे यांनी यावेळी सांगितले.