पुणे : नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी, रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. तसेच रुग्णालयांतर्गत ऑक्सिजन साठवणूक व ऑक्सिजनचे वहन सुरक्षित पध्दतीने करण्याबाबत खबरदारी घ्यावी़ अशा सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत़
शहरातील खासगी रुग्णांलयांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही या पत्रात नमूद केले आहे. पुणे महापालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवण यंत्रणा, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा व ऑक्सिजन संबंधित इतर सर्वबाबी सुरक्षित व सुस्थितीत असल्याबाबत त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे. तसेच त्या ऑडिटचा अहवाल पुणे महापालिकेस सादर करावा असेही नमूद करण्यात आले आहे़