पुणे : पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात यंत्रणा उभी केली आहे. ही गावे क्षेत्रीय कार्यालयांना जोडण्यात आली असून नागरिकांनी या कार्यालयांमधील संबंधित विभागांकडे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासोबतच ग्रामपंचायतींमध्येही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
समाविष्ट ग्रामपंचायतींची कार्यालये ही संपर्क कार्यालय म्हणून क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली काम करणार आहेत. या कामकाजासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांकडून या संपर्क कार्यालयात एका वरिष्ठ लिपिक व त्यावरील अधिकाऱ्याची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. हे संपर्क अधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांचे दैनंदिन कामकाज पाहणार आहेत.
---
प्रामुख्याने जन्म- मृत्यूचे दाखल्याबाबतचे अर्ज, नळजोडाचे अर्ज, बांधकाम परवानगीबाबतचे अर्ज, कर आकारणी कर संकलनाचे अर्ज गोळा करून संबंधित विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी ही संपर्क अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. १८ जुलैपर्यंत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याची पूर्तता करून कामकाज सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
----
औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक ( हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय), कोंढवे- धावडे, कोपरे (वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय), गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी (कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय), वाघोली (नगररोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय), जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी (धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय), नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, नर्हे (सिंहगड रोड- क्षेत्रीय कार्यालय), म्हाळुंगे, सूस (औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालय), बावधन बुद्रुक (कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय).