पुणे : पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्यास गुरूवारी नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभागृहात फलक फडकवावून आंदोलन केले. पालिकेने पहिलीपासूनच सेमी- इंग्रजी सुरू करावे अशी मागणी या वेळी करण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार किमान एका तुकडीत ३० विद्यार्थी असणे आवश्यक असताना महापालिकेच्या ३८ मराठी शाळांमधील पटसंख्या त्यापेक्षा कमी असल्याने त्या या वर्षीपासून बंद कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध केला. या शाळा बंद करून मराठी भाषेची आणखी गळचेपी करू नये, अशी मागणी करण्यात आली. ‘मराठी शाळा , पुण्याची शान’, विद्येच्या माहेरघरात मराठी शाळा बंद करू देणार नाही’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. मराठी शाळा बंद करण्याऐवजी त्यांचा दर्जा सुधारावा, अशी मागणीही करण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सध्या नागरिकांचा कल इंग्रजीकडे वाढला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये पहिलीपासूनच सेमी- इंगज्री सुरू करावे. त्यामुळे नागरिक पुन्हा या शाळांमध्ये पाल्यांना घालतील, असे नगरसेवकांनी सुचविले. मनसेचे गटनेते बाबु वागस्कर यांनीही त्याला मान्यता दिली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले या शाळा बंद केल्या जाणार नाहीत; तर त्यांचे एकत्रिकरण होणार आहे. त्यामुळे कोणाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
महापालिका शाळा पहिलीपासूनच सेमी इंग्रजी करा
By admin | Published: June 26, 2015 4:27 AM