लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वाहतूक शाखेतील पोलिसांच्या साह्यासाठी म्हणून महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गेले तीन महिने वेतनच मिळालेले नाही. पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळांकडून हे वॉर्डन घेण्यात येतात. महापालिका कामगार संघटनेने यात लक्ष घातले असून गुरुवारी सकाळी ११ वाजता संघटनेच्या श्रमिक भवन या कार्यालयात महाराष्ट्र सुरक्षारक्षक आघाडीच्या वतीने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सन २००७ पासून ही योजना राबवण्यात येते. पुणे वाहतूक शाखेचे पोलीस या वॉर्डनची हजेरी नोंदवते व महापालिका त्यांचे वेतन देते. वाहतूक शाखेच्या पोलिसांना हे वॉर्डन वाहतूक नियंत्रणासाठी मदत करीत असतात. योजना सुरू झाल्यापासून कधीही महापालिकेने वेळेवर त्यांचे वेतन अदा केलेले नाही. मात्र अंदाजपत्रकात तरतूद होत असल्यामुळे विलंबाने का होईना, त्यांना वेतन मिळत होते. मात्र यंदाच्या अंदाजपत्रकात या वॉर्डनच्या वेतनासाठी तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळी ३ महिने होऊन गेले तरीही अद्याप त्यांना वेतन मिळालेले नाही. कामगार संघटनेच्या वतीने उदय भट यांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखलच घेण्यात आली नाही.
महापालिकेचे टॅ्रफिक वॉर्डन पगाराविना
By admin | Published: June 29, 2017 3:44 AM