लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात लसीकरण मोहीमेद्वारे १८ ते ४४, ४५ च्या पुढील वयोगट, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करला लस देण्यात येत आहे. परंतु, लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ न शकणाऱ्या अनाथाश्रम, एड्ग्रस्त मुले, वृद्धाश्रम, आजारी व्यक्ती आदी असहाय घटकांना थेट त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मागील तीन दिवसांत पाच ठिकाणी हे लसीकरण पार पडले असून जवळपास ५०० पेक्षा अधिक जणांना लस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
पालिकेने या उपक्रमासाठी स्पेशल बस तयार करून घेतल्या आहेत. पालिकेच्या या ‘व्हॅक्सिन-ऑन व्हील्स’ उपक्रमाला राज्य व केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्ती, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल घटक लसीकरण केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत. लसीकरण केंद्रांवरील गर्दीही वाढत चालल्याने मुळातच ‘इम्युनिटी’ कमी असलेल्या या नागरिकांना असलेला संभाव्य धोका या मोहिमेद्वारे टाळला जाणार आहे. पालिकेला या उपक्रमासाठी काही संस्थानी मदत केली आहे. सध्या सहा बस तयार केल्या असून भविष्यात प्रत्येक प्रभागात एक मोबाईल व्हॅन सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत निवारा वृद्धाश्रम, बाणेर येथील मनोरुग्णालय, मेट्रो कर्मचारी यासोबत आणखी दोन संस्थांमध्ये लसीकरण केले आहे. येथील नागरिकांना लसींचा पहिला डोस देण्यात आला. लसींची उपलब्धता वाढल्यावर आणखी संस्थांना लसीकरण करणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.