पुणे : सर्वत्र पुन्हा उद्भवत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यातही झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व पालिकेच्या समन्वयाने या रोगासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पालिका हद्दीत होणाऱ्या पक्ष्यांच्या मृत्यूबाबत पालिकेच्या १८०० १०३० २२२ या टोल फ्री क्रमांकावर तत्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित सहायक आयुक्त कार्यालयातील अथवा वॉर रूममार्फत त्या विभागातील कार्यरत विभागीय आरोग्य निरीक्षक यांना माहिती कळविण्यात येणार आहे. हे आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांमार्फत मृत पक्षी गोळा केले जातील. हे पक्षी ५० मायक्रोनपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये गोळा करून औंध येथील पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृत पक्ष्यांना खड्ड्यामध्ये पुरून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. पक्ष्यांना खड्ड्यामध्ये पुरण्यासाठी पुरेसा चुनखडीचा वापर करणे आवश्यक असून, पक्षी इन्सिनेरेटर प्लांटमध्ये जाळण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. ही कार्यवाही करण्यापूर्वी आरोग्य खात्याच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.