लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस पुरवठा, साठ्याच्या नोंदी असणाऱ्या राज्य शासनाकडील ‘ई-विन’ सॉफ्टवेअरमध्ये पुणे महापालिकेकडे लसीचा मुबलक साठा शिल्लक असल्याची नोंद आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. १२) महापालिकेला मागणीनुसार प्राप्त होणारा ९० हजार डोसचा पुरवठा मिळू शकला नाही. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांवर पुढील दोन दिवस तरी लसीची कमतरता भासण्याची शक्यता आहे़
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासून ‘को-विन’ अॅपमधील तांत्रिक बिघाडाच्या अडथळ्यांमुळे त्रस्त महापालिकेला राज्य शासनाच्या ‘ई-विन’ सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडाला किंबहुना चुकीच्या नोंदीला नाहक सामोरे जावे लागत आहे. परिणामी पुणे महापालिकेला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘उसन्या’ घेतलेल्या १५ हजार लसींवरच पुढील दोन दिवसांचे लसीकरण सुरू ठेवावे लागणार आहे़
आजमितीला महापालिकेकडे केवळ १४ हजार लस उपलब्ध असल्याने आहे त्या साठ्यातच शहरातील ८५ लसीकरण केंद्रांना तुटपुंजा का होईना दोन दिवस पुरवठा करावा लागेल. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी हजारो डोसचे पैसे भरले असले तरी पुढील दोन दिवस त्यांना केवळ शंभर किंवा दोनशेच डोस दिले जाणार आहे़
-----------------------------
कोट :-
“राज्य शासनाकडील लसपुरवठा यंत्रणेतील नोंदी दुरुस्त झाल्यावर लागलीच महापालिकेला ९० हजार डोस मिळतील़ महापालिकेकडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू आहे. ही समस्या काही काळात संपून लसीकरण व्यवस्था सुरळीत होईल.”
-डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, महापालिका
-----------------