लक्ष्मण मोरे- पुणे : शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या वृक्ष छाटणी, झाडपडीच्या घटना, वृक्षतोड यामधून निर्माण झालेले हजारो किलोंचे लाकूड नेमके जाते कुठे याची एकत्रित माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या लाकडाची बेकायदेशीरपणे काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.
महापालिकेने वृक्ष प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे. यापुर्वी पालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून वृक्षतोडीमधून जमा झालेल्या लाकडाचा लिलाव करुन त्याचे पैसे पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केले जात होते. परंतू, मागील दहा बारा वर्षात अशा प्रकारचा लिलाव झालेला नाही. महापालिका आयुक्तांच्या निर्णयानुसार काही वर्षांपुर्वी वृक्ष प्राधिकारी म्हणून स्थानिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. नागरिकांना वृक्षतोडीच्या परवानगी, अर्ज आदींबाबत शहराच्या विविध भागातून पालिकेमध्ये यावे लागू नये याकरिता स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले. अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर वृक्षांसंबंधीची कारवाई सुरु करण्यात आली.
पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर झाडपडीच्या घटना घडतात. यामध्ये मोठ्या डेरेदार वृक्षांचाही समावेश असतो. यासोबतच अनेकदा नागरिक पालिकेला पत्र देऊन वृक्ष काढण्यास सांगतात. तर, रस्ता रुंदीकरण, विकास कामांसाठीही अनेकदा झाडे काढावी लागतात. या काढलेल्या अगर तोडलेल्या वृक्षांचे लाकूड पालिकेचे कर्मचारी उचलून नेतात. अधिकारांचे विकेंद्रीकरण होण्यापुर्वी हे लाकूड एकाच ठिकाणी जमा करुन त्याचा लिलाव केला जात असे. परंतू, विकेंद्रीकरणानंतर या लाकडाचे नेमके काय होते याकडे कोणीही लक्ष देत नाही.
किती लाकूड तोडले गेले, त्याचे वजन किती होते, किती लाकूड जमा आहे याची एकत्रित माहितीच पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर जमा होणारे हे लाकूड कुठे ठेवले जाते याचीही एकत्रित माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. २००९ साली न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल २०१३ साली लागला. वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करणे, त्याच्या कामकाजाविषयी मार्गदर्शक सूचना, तज्ञ समितीचे गठन करणे आदी गोष्टींचा समावेश या निकालामध्ये होता.
दरवर्षी पालिका वृक्ष गणना करते. शहरात कोणत्या जातीची किती झाडे आहेत, झाडे वाढली की कमी झाली याची माहिती या अहवालामधून दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. वृक्ष तोडणी, छाटणी आदी कामांच्या रजिस्टरमध्ये नोंदी केल्या जातात. परंतू, तोडलेल्या लाकडाचे नेमके पुढे काय केले जाते याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. शहरामध्ये टिंबर मार्केटसह वखारींमध्ये या लाक डाची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून पालिकेची मालमत्ता असलेल्या लाकडांच्या परस्पर लावल्या जाणाऱ्या ‘विल्हेवाटी’कडे होणारे दुर्लक्ष पालिकेचे आर्थिक नुकसान करत आहे.=====शहरातील वृक्षांच्या कापणीनंतर निर्माण झालेल्या हजारो किलो लाकडाचे रेकॉर्ड ठेवले जात नाही. त्याचे ऑडिट केले जात नाही. या लाकडाची परस्पर विक्री केली जाते. पैसे कमाविण्याचे छुपे साधन मिळाले असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा छडा लावण्याची आवश्यकता आहे.- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच===== पालिकेची सूत्रे स्विकारल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेतली होती. परंतू, या बैठकीमध्ये लाकडाचे नेमके काय केले जाते याची माहिती दिली गेली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले असून याची माहिती घेतली जाईल असे स्पष्ट केले.=====वृक्ष प्राधिकरण समितीची मी सदस्या आहे. आजवर कधीही प्राधिकरणाच्या कोणत्याही बैठकीत अगर एरवीही या लाकडाचे नेमके काय केले जाते याची माहिती दिली गेलेली नाही. याबाबत प्रशासनाकडून माहिती घेणे आवश्यक असून लाकडाचा काळाबाजार होत असल्यास ही गंभीर बाब आहे. याची चौकशी व्हायला हवी.- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या तथा वृक्ष प्राधिकरण सदस्या