पुणे : तळजाई टेकडी ते सिंहगड रस्त्यादरम्यान बोगदा तयार करण्यासाठी, पुणे महापालिकेने महामेट्रोकडे मदत मागितली आहे़. पालिकेकडे असलेल्या तज्ज्ञ सल्लागारांमध्ये एकही बोगदा निर्मितीसाठी काम करणारा तज्ज्ञ नसल्याने बोगद्याच्या कार्य पूर्ततेसाठी पालिकेला महामेट्रोकडे धाव घ्यावी लागली आहे़. महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांनी याबाबत महामेट्रोला नुकतेच पत्र पाठविले आहे़. या पत्रात त्यांनी, पालिकेकडील सल्लागार समितीत बोगदा निर्मितीच्या कामासाठी आवश्यक तज्ज्ञ सल्लागार नसल्याचे सांगितले आहे़. परिणामी उपलब्ध सल्लागारांकडून बोगद्याच्या निर्मितीचे काम करणे शक्य नसल्याने, महामेट्रोने त्यांच्याकडील बोगद्याचे काम करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ सल्लागारांची माहिती द्यावी अशी विनंती केली आहे़. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील लोकसंख्या व वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने भेडसावत आहे़. त्यातच तळजाई परिसर ते सिंहगड रस्ता असा थेट रस्ता नसल्याने, नागरिकांना स्वारगेट किंवा कात्रज मार्गावरून सिंहगड परिसराकडे जावे लागते. यामुळे या रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला येथे नित्याने सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून मनपाच्या विकास आराखड्यात तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्यासाठी बोगदा बनविण्याचे नियोजन केले आहे़. या कामाची कार्यवाही सुरू करतानाच पालिकेला हा बोगदा कसा तयार करावा याकरिता तज्ज्ञाची गरज पडली असून, बोगदा तज्ज्ञ सल्लागारासाठी पालिकेला आता महामेट्रोचे दार ठोठविण्याची वेळ आली आहे़. चौकट -११ डिसेंबर २०१२ रोजी पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या प्रस्ताव क्रमांक १६०२ नुसार सल्लागारांच्या समितीला मान्यता देण्यात आली आहे़. त्यानुसार सल्लागार समिती नियुक्तही झाली. मात्र, यामध्ये बोगदा तज्ज्ञ सल्लागार नाही़ या समितीत केवळ केवळ रस्ते व पुलांच्या कामासाठीचेच तज्ज्ञ सल्लागार आहेत.
बोगदा खोदण्यासाठी पालिकेची महामेट्रोकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 10:04 PM
तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्यासाठी बोगदा बनविण्याचे नियोजन
ठळक मुद्देतज्ज्ञ सल्लगाराच्या मदतीसाठी पाठविले पत्र