पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता पालिकेने कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यास सुरुवात केली असून, आजमितीस पालिकेची सहा हजार खाटांची तयारी पूर्ण झाली असून, टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार हे कोविड सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शुक्रवारपासून एसएनडीटी महाविद्यालयात ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा एप्रिल महिन्यात कमालीचा वाढला आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटांची मागणी वाढली आहे. यासोबतच जे रुग्ण गृहविलगीकरणात राहू शकत नाहीत, अशा रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती.
कोविड केअर सेंटरमधील ८६८ खाटा रिकाम्या
शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. या कोविड सेंटरमध्ये १७०० खाटा उपलब्ध आहेत. यातील ११३२ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ५६८ खाटा रिकाम्या आहेत. यामध्ये आणखी एसएनडीटीमधील ३०० खाटांचा समावेश झाला आहे.
गृहविलगीकरणाची सोय नसलेल्यांसाठी सुविधा
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजारांच्या घरात गेली आहे. यातील जवळपास ४५ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मात्र, अनेक रुग्णांच्या घरात जागा नाही. एकच टॉयलेट असल्याने अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे.
------
आणखी ६ हजार २५० खाटांची तयारी पूर्ण
एसएनडीटी महाविद्यालय, औंध आयटीआय, कोंढवा, सिंहगड इन्स्टिट्यूट, कृषी विद्यालय बॉईज हॉस्टेल, क्रीडा संकुल बालेवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येरवडा आणि घोले रोड याठिकाणी तब्बल २ हजार ५०० खाटा तयार आहेत. यासोबतच विविध ठिकाणी आणखी ३ हजार ७५० खाटा तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मोहोळ म्हणाले.
-----