पुणे : पालिका प्रशासनाकडून चालू वर्षात धोकादायक असलेल्या ३३ वाड्यांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी १२ वाड्यांवर कारवाई करीत हे वाडे उतरविण्यात आले होते. पालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना वाढीव चटई क्षेत्र देण्यात येत असल्याने भाडेकरूंनाही ३०० चौरस फुटांची सदनिका मिळत आहे. त्यामुळे भाडेकरू आणि विकासक यांच्यातील वाद कमी झाले आहेत. त्यामुळे आगामी काही वर्षांत शहरातील वाड्यांच्या विकसनाचा प्रश्न मार्गी लागेल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिकेच्या हद्दीत आजमितीस ३३० वाडे आहेत. पालिकेच्या वर्गावारीनुसार, अत्यंत धोकादायक (सी - एक), दुरुस्ती आवश्यक (सी - दोन), रिक्त न करता दुरुस्ती योग्य (सी - तीन) अशी रचना करण्यात आलेली आहे. सी एकमध्ये चार, सी दोनमध्ये २१४, सी तीनमध्ये ११४ वाडे आहेत. शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव आणि नवी पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, कसबा येथे हे वाडे आहेत.
गेल्या वर्षी उच्च न्यायालयाच्या परवानगीने १२ वाडे रिकामे करून उतरविण्यात आले होते. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या क्लस्टर धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर मध्य पुण्याचा विकास झपाट्याने होईल असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
----
दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पालिकेकडून धोकदायक वाड्यांची पाहणी करून धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात येतात. अतिधोकदायक वाडे सक्तीने रिकामे केले जातात.