पुणे : महापालिकेच्या संभाजी उद्यानातील ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा सोमवारी मध्यरात्री संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून हटविण्यात आलेला पुतळा सन्मानाने पुन्हा बसविण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये सर्व पक्षांनी एकमताने मंजूर केला. पुतळा बसविला जाईपर्यंत त्या ठिकाणी गडकरी यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.महापालिकेच्या मुख्य सभेला सुरुवात होताच गडकरी यांचा पुतळा हलविल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेना, रिपाइं आदी सर्वच पक्षांच्या वतीने या प्रकरणाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध कण्यात आला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी संपूर्ण घटनेची सभागृहाला माहिती दिली. सोमवारी मध्यरात्री ४ अज्ञात तरुणांनी पुतळ्याची मोडतोड करून ते नदीच्या दिशेने गेल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, माधुरी सहस्रबुद्धे यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.नवीन पुतळा योग्य पद्धतीने बनविला आहे ना, यासाठी कला संचलनालयाची मान्यता घ्यावी लागेल, तरी लवकरात लवकर पुतळा बसविण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल, असे राजेंद्र जगताप यांनी या वेळी स्पष्ट केले. नवीन पुतळा बसविला जाईपर्यंत गडकरी यांचे तैलचित्र त्या ठिकाणी लावण्यात यावे, अशी सूचना अरविंद शिंदे यांनी केली. भाजपासह सर्व पक्षाने याला अनुमती दिली.शिवसृष्टीच्या जागेचा निर्णय राज्य शासन घेणारशिवसृष्टी प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे, याची विचारणा नगरसेवक दीपक मानकर यांनी मुख्य सभेत केली. कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी उभारण्यात यावी, असा ठराव मुख्य सभेने मंजूर केला आहे. त्याचबरोबर या जागेवर मेट्रोचे स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसृष्टी व मेट्रोसाठी कोणती जागा वापरली जाईल, याचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार असल्याचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, पुतळा उखडल्याच्या घटनेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संभाजी ब्रिगेडने पुणे महापालिकेच्या निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित होण्याचा प्रयत्न असल्यानेच लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार झाला असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शक्तींमार्फत हा प्रयत्न होत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा केला जाईल. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे.- प्रशांत जगताप, महापौर
पालिका सन्मानाने पुतळा बसविणार
By admin | Published: January 04, 2017 5:33 AM