पुणे : कोरोनावरील बहुप्रतिक्षीत लस यशस्वी ठरल्यानंतर आता ही लस रुग्णांना देणार आहे. ही लस जानेवारीमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील रुग्णांच्या देखभालीची आणि उपचारांची जबाबदारी महापालिकेवर असल्याने ही लस देण्याची जबाबदारीही पालिकेकडेच येणार आहे. सिरमकडून प्राप्त होणाऱ्या लसी ठेवण्याकरिता पालिका यंत्रणा उभारण्याच्या विचारात आहे. याबाबत पालिका आयुक्तांसोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तसेच स्थायी समितीचीही मान्यता घेतली जाईल असे अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
कोरोनाची लस तयार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती घेतली होती. त्यानंतर, या लसीच्या उत्पादनाला वेग दिला आहे. जगभरात या लसीबाबत उत्सुकता आहे. लसीच्या ‘स्टोरेज’बाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. या मार्गदर्शक सूचनांची वाट न पाहता मुंबई महापालिकेने ‘कोल्ड स्टोरेज’ उभारण्यास सुरुवात केली आहे.
लोकसंख्या आणि संभाव्य रुग्णसंख्या यांचा विचार करता पुण्यामध्येही मोठ्या प्रमाणावर लस लागण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने लस घेतल्यास या लसी ठेवायच्या कुठे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या पालिकेच्या रुग्णालयांमधील ‘इम्युनायजेश सेंटर’मध्ये या लस ठेवता येऊ शकणार आहेत. परंतु, या लसींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागू शकते. तशी व्यवस्था करण्याचा विचार सुरु असून अद्याप याबाबत कोणताही निर्णय किंवा चर्चा झालेली नाही. आयुक्तांसोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले.