पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात पालिकेला ऑक्सिजन मिळवतानाही नाकी नऊ आले. ऑक्सिजन प्रकल्पांची आवश्यकता लक्षात घेऊन पालिकेने सीएसआर तसेच अन्य मदतीतून ऑक्सिजन प्रकल्प उभारणी सुरु केली. यातले दोन प्रकल्प प्रत्यक्षात सुरु झाले असून लवकरच ही संख्या १२ पर्यंत नेण्यात येणार आहे.
रुग्णसंख्या कमी होत असली तरी गंभीर रुग्णसंख्या अजूनही घटलेली नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून पालिकेने ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. पालिकेच्या नियोजनात असलेल्या बारा प्रकल्पामधून १० हजार ५८३ लिटर/प्रति मिनिट ऑक्सिजन तयार होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. ऑक्सिजनचे नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मध्यम आणि मोठ्या क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेमार्फत ८ रुग्णालयात १२ प्रकल्प बसविण्यात येत आहेत. यापैकी काही प्रकल्प अमेरिका, फ्रान्स आणि नेदरलँडवरून मागविण्यात येत आहेत. तर काही प्रकल्प झिओलाईट व इतर काही महत्त्वाचे सुटे भाग (पार्ट) आयात करून भारतात बनविण्यात येणार आहेत. पालिकेकडे सध्या ४० टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी एकूण ७ टँक बसविण्यात आले आहेत.
फोटो : जेएम एडिटवर