किरण शिंदे
पुणे- कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतारदऱ्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला. प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात आता आणखी नवीन माहिती समोर आली असून याच दोघांनी 17 डिसेंबर रोजी आणखी एकावर गोळ्या झाडल्या होत्या. शरद मोहोळचा खून करण्यासाठी मदत न केल्याने त्याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. भूगाव परिसरात हा प्रकार घडला.याप्रकरणी आता बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय सुतार (वय 27, रा. भूगाव) याला आरोपी नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळच्या खुनात सहकार्य करण्यासाठी बोलावून घेतले होते. 17 डिसेंबर रोजी नामदेव कानगुडे याने अजय सुतार याला आपल्या भूगाव येथील राहत्या घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्याला आम्ही शरद मोहोळचा खुन करणार असून त्यासाठी मदत करण्यास सांगितले. मात्र अजय सुतार याने त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याने अजय याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी साहिल पोळेकर याने त्याच्यावर 2 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी फिर्यादीच्या पायाला लागली.
दरम्यान गोळ्या लागल्यानंतर आरोपीनीच अजय सुतार याला रुग्णालयात नेले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने याविषयी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र शरद मोहोळच्या खुनानंतर आरोपींनी यापूर्वी गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करून पौड पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार आहे.