दावडी : खेड तालुक्यात कुठलीही आरोग्यविषयक पदवी नसलेल्या डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ पाहत आहे. अनेक वर्षांपासून गावातील काही नागरिकांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने खेड्यापाड्यांतील भोळ्याभाबड्या जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस मुन्नाभार्इंची दुकानदारी बंद करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडले आहेत. गावातील लोक लवकर गुण येतो म्हणून अशा प्रकारे अवैधरीत्या व्यवसाय करणाºयाकडे वळतात. बोगस मुन्नाभाई कार्यकर्त्यांना तसेच स्थानिक पुढाºयांना हाताशी धरून गावात विनापरवाना दवाखाना उभारतात. मूळव्याध, फिशर, थंडीताप आदी आजारांवर गोळ्या-औषधे देतात. येथे कसलीच सुविधा नसताना जीवघेणे आपरेशन करतात. जास्त पॉवरच्या गोळ्या-औषधे तसेच इंजेक्शन दिल्याने किडनी खराब होणे, हाडे ठिसूळ होणे यासारखे विविध आजार जडू शकतात. रुग्णांच्या जिवाशी खेळणाºया तथाकथित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे; त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या नियमानुसार अधिकृत वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टर यांनाच शास्त्रीय उपचार करण्यास परवानगी आहे, असे एका वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले. तालुका स्तरावर बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना सूचना देऊन खेड तालुक्यात कुठल्या गावात बोगस डॉक्टर असतील त्यांच्यावर कारवाई होईल. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात मुन्नाभार्इंचा सुळसुळाट, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:36 AM