लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या व्यावसायिक वैमन्यस्यातून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्यांचे या व्यवसायातील प्रतिस्पर्धी बाळासाहेब जयवंत खेडेकर यांनी आखाडे यांना मारण्याची सुपारी दिली होती. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीसांनी ८ जणांना अटक केली आहे. हत्या करणारे दोन जण अद्याप फरार आहेत.
रामदास रघुनाथ आखाडे ( वय ३८, रा. जावजी बुवाची वाडी, ता दौंड जि पुणे ) यांचा गंभीर जखमी झाल्याने गुरूवारी मृत्यू झाला. त्यांच्या हत्येप्रकरणी बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली), निखिल मंगेश चौधरी (वय २०), गणेश मधुकर माने (वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३, रा.उरुळी कांचन, ता. हवेली), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७, रा. सोरतापवाडी, ता हवेली), करण विजय खडसे (वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता.दौंड) व सौरभ कैलास चौधरी (वय २१, रा खेडेकर मळा ता.हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने सोमवार पर्यंत (दि २६) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेले रामा वायदंडे व निलेश आरते (दोघे रा. हडपसर) हे फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि १८) रघुनाथ आखाडे हे त्यांच्या उरुळी कांचन येथील खेडेकर मळयातील गारवा हॉटेलसमोर असताना रात्री ८.४५ च्या सुमारास खुर्चीवर फोनवर बोलत होते. त्यावेळी रामा वायदंडे त्यांच्या जवळ आला. व तलवारीने आखाडे यांच्या डोक्यावर वार केला. यानंतर त्याला काहींनी पडकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलवारीचा धाक दाखवत महामार्ग ओलांडत आरते याच्या दुचाकीवर बसून दोघे फरार झाले होते.
आखाडे यांचे गारवा हॉटेलचा दररोजचा व्यवसाय सुमारे दोन ते अडीच लाख तर खेडेकर यांचे अशोका हॉटेलचा व्यवसाय ५० ते ६० हजार होता. आखाडे यांचे हॉटेल कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर याने आपला भाचा सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी त्याला दररोज एक ते दोन हजार रुपये देऊ असे सांगितले. त्यानुसार सौरभ याने त्याचा साथीदार वायदंडे, आरते व इतरांच्या मदतीने खून केला. यांतील बाळासाहेब खेडेकर यांचेसह सौरभ चौधरी, आरते, माने, खडसे व निखिल चौधरी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व उपनिरीक्षक दादाराजे पवार करत आहेत.