लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेल्या १३ दिवसांच्या बाळाचा खून करून त्याचा मृतदेह विमाननगरमधील जंगलात टाकून दिल्याचे उघड झाले आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकाराचा अडीच वर्षांनंतर तपास करून घटनास्थळावरून मुलाला गुंडाळलेली शाल व त्याचे कपडे सापडले असून, फिर्यादीने ते ओळखले आहेत. मुंढवा पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी एका २५ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर महेश भांडे (वय २३, रा. वडगाव शेरी) व त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (२६, रा. मांजरी) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.
याबाबत मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेले मूल महेश भांडे याला नको होते. त्यामुळे त्याने आश्रमात ठेवतो, असे सांगून १३ दिवसांचे बाळ घेऊन तो मित्रासह खांदवेनगर येथील जंगलात गेला. तेथे त्याने काटेरी झाडीत बाळाला मारून टाकले. ही जागा आज भांडे याने दाखविली. तेथे पोलिसांना बाळाला गुंडाळलेली शाल व त्याचे रक्त लागलेले कपडे मिळाले. यावेळी तेथून जाणाऱ्या एका शेतकऱ्याने या दोघांना हटकले होते. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. या दोघांनी त्या शेतकऱ्याला धमकावल्याने त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही.
फिर्यादी तरुणी व आरोपी शुभम भांडे दोघे एकाच कंपनीत काम करत असल्यामुळे ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१७ पासून दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. १४ मार्च २०१९ मध्ये फिर्यादी तरुणीने ससून रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. ही बाब त्यांनी घरी सांगितली नव्हती. शुभम व योगेश हे दोघे २७ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बाळाला आश्रमात ठेवण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते. बाळाबाबत काही सांगत नसल्याने आता या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.